पाड्यावरचे विद्यार्थी म्हणतात हजारपर्यंतचे पाढे; त्र्यंबकेश्वरचे शिक्षक केशव गावित यांची कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 07:51 AM2023-09-05T07:51:05+5:302023-09-05T07:51:43+5:30
या पाड्यापासून ५०० मीटरवर डोंगरावर एका शेतकऱ्याने घराशेजारील झोपडी शाळेसाठी दिली आहे
- धनंजय रिसोडकर
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी या आदिवासी पाड्यावरील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ५५ विद्यार्थी बेपासून हजार व त्यापुढे सुमारे ११५० पर्यंतचे पाढेही तोंडपाठ म्हणतात. त्याशिवाय सर्व विद्यार्थी एकाचवेळी दोन्ही हातांनी दोन भिन्न विषय किंवा एका हाताने भाषा आणि दुसऱ्या हाताने गणित सोडवण्याचा चमत्कारदेखील करून दाखवतात. तसेच एका हाताने मराठी, तर दुसऱ्या हाताने इंग्रजीही सहज व वेगाने लिहून दाखवण्याची सर्व किमया केशव गावित या शिक्षकाने घडविली आहे.
त्र्यंबकनजीकच ३५ कुटुंबे असलेला हिवाळी हा पाडा आहे. या पाड्यापासून ५०० मीटरवर डोंगरावर एका शेतकऱ्याने घराशेजारील झोपडी शाळेसाठी दिली आहे. त्याठिकाणच्या शाळेत केशव गावित हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे गावित यांनी या मुलांना प्राथमिक शिक्षणापासून प्रारंभ करत आता त्यांना इतक्या वेगळ्या प्रकारचे शिक्षण दिले आहे की, शहरातील इंग्रजी शाळांतील मुलांनाही जे जमत नाही ते सर्व काही हिवाळीच्या शाळेतील विद्यार्थी सहजरीत्या करून दाखवतात. एकाचवेळी दोन्ही हातांनी सहज लिहिताना दोन्ही लिखाणांची गती सारखीच असून कुणी एका हाताने चित्र काढतो, तर दुसऱ्या हातांनी पाढे किंवा गणित सोडवतो, तेदेखील अगदी सहज.
विद्यार्थ्यांचे वैशिष्ट्य
पहिलीमध्ये दाखल होण्याआधीच मुलांना लेखन, वाचन, पाढे, काही शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग पाठ असतात. पहिलीतील विद्यार्थ्यांना ५० पर्यंत तर पुढील विद्यार्थ्यांचे हजार ते बाराशेपर्यंतचे पाढे पाठ आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला वेल्डिंग, इलेक्ट्रिक, शिवणकाम, गवंडीकाम, यांसारखी कौशल्ये आत्मसात आहेत. गावाच्या भिंतींवर वारली चित्रे काढली आहेत. शाळेतील शंभर टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
शाळा भरते ३६५ दिवस
हिवाळीतील या शाळेला एकही दिवस सुटी नसून ती ३६५ दिवस भरते. दररोज १२ ते १३ तास शाळा भरते. सकाळी ७:३० वाजता बालवाडी ते ९ वी पर्यंतचे विद्यार्थी येतात.
केशव गावित हे एकमेव शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना शिकवतात. तसेच नियमित अभ्यासासह खेळ, सेंद्रिय शेतीसह व्यावहारिक धडेही विद्यार्थी गिरवतात. रात्री ९ पर्यंत शाळा सुरू असते.