ग्रामपालिकेने देवी ट्रस्टपुढे पसरला पदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:10 AM2021-04-29T04:10:54+5:302021-04-29T04:10:54+5:30
शासनाने ३० एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश काढलेले आहेत. त्यामुळे गडावरील यावर्षीचा चैत्रोत्सवही रद्द केल्याने येथील व्यावसायिकांसह ...
शासनाने ३० एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश काढलेले आहेत. त्यामुळे गडावरील यावर्षीचा चैत्रोत्सवही रद्द केल्याने येथील व्यावसायिकांसह व ग्रामस्थांची नाराजी पाहायला मिळाली. गतवर्षीही शासनाने लाॅकडाऊन लावला होता तेव्हाही देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद होते; परंतु यावर्षी कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने पुन्हा ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांसह ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. गतवर्षी ट्रस्टने लाॅकडाऊनच्या काळात गावात चौकाचौकात जाऊन मोफत भोजन ग्रामस्थांना दिले होते. याठिकाणी अन्य कुठलाही व्यवसाय नसल्याने हातावर पोट असलेल्यांची व व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. येथील ग्रामस्थांचा रोजगार व व्यवसाय पूर्णत: बंद झालेला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना ट्रस्टकडून सकाळी व संध्याकाळी अशा दोन्ही वेळेस पोळी-भाजी देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने ट्रस्टकडे पत्राद्वारे केली आहे.
कोट....
गावाची लोकसंख्या अडीच ते तीन हजार असून सप्तशृंगगडावर कडकडीत बंद पाळला जात असल्याने सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. गावाची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून ट्रस्टने त्वरित निर्णय घेऊन ग्रामस्थांसाठी भोजनाची व्यवस्था करावी.
- ईश्वर कदम, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष
कोट....
कोरोनामुळे गतवर्षी लाॅकडाऊन असल्याने सप्तशृंगगडवासीयांची वाईट परिस्थिती झाली होती. पुन्हा एप्रिल महिन्यापासून तीच परिस्थिती उद्भवली असून येथे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून फक्त पूजा साहित्य आदी व्यवसाय आहेत. ग्रामपंचायतीने गेल्या आठ दिवसांपासून पत्राद्वारे मागणी केली असून ट्रस्टने अद्याप कुठलीही भूमिका घेतलेली नाही. - दीपक जोरवर, जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस