वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:18 AM2017-12-26T00:18:46+5:302017-12-26T00:19:13+5:30
वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असून, विविध गल्ली, कॉलन्यांमधील रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे, दरम्यान जॉगींग ट्रॅक देखील गाजर गवतामध्ये जणु काही हरवला आहे.
नाशिक : वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असून, विविध गल्ली, कॉलन्यांमधील रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे, दरम्यान जॉगींग ट्रॅक देखील गाजर गवतामध्ये जणु काही हरवला आहे. वडाळागाव हे महापालिका हद्दीत असूनही नसल्यासारखे आहे. येथील नागरिकांना सर्व कर भरूनही नेहमी विविध सोयीसुविधांचा लाभ घेताना संघर्ष करावा लागतो हे विशेष! वडाळागावातील गोपालवाडी रस्त्याची दुरवस्था होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे; मात्र अद्याप पालिकेला या ठिकाणाच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यास वेळ मिळालेला नाही. तसेच येथील भूमिगत गटारी वर्षाच्या बारमाही रस्त्यावरून वाहत असूनही त्यावर भुयारी गटार विभागाला कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास अपयश येत आहे. तसेच येथील सार्वजनिक शौचालयाची मल साठवणूक टाकी फुटल्याने मोकळ्या भूखंडावर मल-मूत्राचे डबके साचले असून, परिसरातील नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. तसेच संजरी मार्ग या अरुंद गल्लीमधील रस्त्याची दैना झाली असून, भूमिगत गटारीच्या चेंबरजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खंडोबा चौकापासून पुढे पांढरीआई देवी चौक तसेच माळ गल्लीसह हनुमान मंदिरापर्यंतच्या मुख्य रस्त्यांची वाताहत झाली आहे. वडाळा चौफुली ते खंडोबा चौक हा मुख्य रस्ता मागील दोन पंचवार्षिक निवडणुकांपूर्वी डांबरीकरण करण्यात आला होता. तेव्हापासून या रस्त्यावर केवळ थिगळ लावत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावातील सर्वच अंंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम असून, याकडे लोकप्रतिनिधींनाही लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रभाग ३०मध्ये समाविष्ट असलेल्या वडाळागावाला जणू कोणी वालीच राहिले नसल्याची भावना रहिवासी बोलून दाखवित आहे.
नगरसेवक चार; समस्या हजार
वडाळागावचा सर्वांगीण विकास सातत्याने खुंटलेला आहे. गावाला यंदा चार लोकप्रतिनिधी लाभले खरे; मात्र आपापसामधील मतभेद सोडविताना संबंधितांची दमछाक होत आहे. नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रशासनदरबारी त्यांना पाठपुरावा करण्यास वेळ मिळत नसल्याची चर्चा गल्लीबोळात होत आहे. वडाळा चौफुलीवरील वाहतूकबेटाला सुशोभिकरणाची असलेली प्रतीक्षा, वडाळा चौफुली ते साईनाथनगरपर्यंत रखडलेल्या जॉगिंग ट्रॅकची झालेली दुर्दशा, केबीएच विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सातत्याने साचणारा कचरा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, रझा चौक, झीनतनगर भागातील रस्त्यांची दुर्दशा अशा एक ना अनेक समस्या येथील नागरिकांना कायमस्वरूपी भेडसावत आहे.