पावसाअभावी संरक्षित पाण्यावर भातलावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:32+5:302021-07-07T04:16:32+5:30
नांदूरवैद्य : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदगाव बुद्रुक, तसेच टाकेद ...
नांदूरवैद्य : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदगाव बुद्रुक, तसेच टाकेद परिसरातील धामणगाव, अडसरे, अधरवड, भरविर खुर्द, मायदरा, बांबळेवाडी आदी परिसरात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे भात लागवड लांबणीवर पडली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची रोपे पिवळी पडू लागली आहेत. त्यातच तालुक्यातील धरणांच्या जलसाठ्यात देखील पुरेसा साठा नसल्यामुळे विहिरी, बोअरवेलचा आधार घेत संरक्षित केलेल्या पाण्यावर भातलावणी करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे.
इगतपुरी तालुक्यात आत्तापर्यंत अत्यंत कमी पावसाची नोंद झाली असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पावसामुळे शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. तालुक्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अतिशय कमी जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या भात पिकाची लागवड करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. तालुक्यातील टाकेद, धामणगाव, भरवीर, अडसरे, सोनोशी, मायदरा आदी असलेल्या डोंगराळ भागातही हीच परिस्थिती आहे. वाडीवऱ्हे, वैतरणा, सांजेगाव, म्हसुर्ली, नागोसली या पश्चिम पट्ट्यात पाऊस असल्याने या भागात भात लागवड अंतिम टप्प्यात आहे. मात्र, तालुक्याच्या पूर्व भागात अद्यापपर्यंत पाऊसच नसल्याने लागवडी सुरू झालेल्या नाहीत. इगतपुरी तालुका हा नाशिक जिल्ह्यातील अति पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. मात्र, भौगोलिक विचार केल्यास तालुक्याच्या निम्म्याहून अधिक भागात चालू वर्षी पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
---------------------
लागवडीला वीज पुरवठ्याचा खोडा
आधीच पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भात लागवडी सुरू आहेत. परंतु वीजपुरवठा उच्च दाबाने होत नसल्याने शेती कामात व्यत्यय येत असल्याने अडचणी कायम आहेत. अनेक वेळा टाकेद भागात सर्रासपणे वीजपुरवठा खंडित होतो आहे तर विजेचा लपंडाव होतानाचे चित्र असल्याने शेतकऱ्यांसह नागरिक संतप्त होत आहेत.
-------------------
सध्या पावसाची तुरळक रिमझिम व मध्येच होणाऱ्या उघडीपमुळे ऊन पडत असल्याने शेतकरीवर्ग जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत कायम आहे. भात रोपे तयार असून, केवळ पावसाच्या पाण्याअभावी लागवडी खोळंबल्या आहेत. पावसाअभावी रोपे पिवळी पडत असून, खराब होण्याच्या मार्गावर आहेत. आजही शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा प्रश्न कायम आहे.
- पांडुरंग वारुंगसे, शेतकरी.)
इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथे पावसाअभावी आरक्षित पाण्यावर भाताची लावणी करतांना शेतकरी. (०६ नांदूरवैद्य १)
060721\06nsk_3_06072021_13.jpg
०६ नांदूरवैद्य १