Padma Award : अदनान सामींचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान, नवाब मलिकांचं खोचक ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 05:24 PM2021-11-08T17:24:34+5:302021-11-08T17:27:45+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते आज राजधानी दिल्ली येथे पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. राजभवनात शानदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल मानकरी महोदयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
नवी दिल्ली - गायक अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी, मनसेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यास विरोध केला. पाकिस्तानमधून कोण इथं येऊन जय मोदी हा नारा देत असेल तर त्याला देशाचं नागरिकत्व दिलं जातं अन् पद्मश्री पुरस्कार मिळतो हे स्पष्ट उदाहरण आहे, असे राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. आता, पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी अदनान सामी आणि केंद्र सरकारवर टीका केलीय.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते आज राजधानी दिल्ली येथे पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. राजभवनात शानदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल मानकरी महोदयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामध्ये, बॉलिवूड, कला, क्रीडा, साहित्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. गायक अदनाना सामी यांनीही राष्ट्रपतींच्याहस्ते हा पुरस्कार स्विकारला. मात्र, अदनाना सामी यांनी पुरस्कार स्विकारताच मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
President Kovind presents Padma Shri to Shri Adnan Sami Khan for Art. He is a world renowned and celebrated music composer, concert pianist, singer and actor. pic.twitter.com/8ybkPIqhJR
— President of India (@rashtrapatibhvn) November 8, 2021
अदनान सामीला पुरस्कार देणं हा देशातील जनतेचा अपमान आहे, अशी टीका नवाब मलिकांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर केली होती. आता, सामी यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतरही मलिक यांनी सामी आणि केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे. जे आमच्यासोबत आहेत, त्यांना आम्ही नागरिकताही देऊ आणि पद्मश्रीही. मग, ते पाकिस्तानचे का असेनात. अदनाना सामी यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन... असे खोचक ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे.
हमारे साथ जो हैं उन्हे हम नागरिकता भी देंगे और पद्मश्री भी.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 8, 2021
चाहे वह पाकिस्तान से क्यों ना हो.
अदनान सामी को पद्मश्री पुरस्कार मिलने पर बधाई !!!
दरम्यान, कला क्षेत्रातून ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्यासह गायक अदनान सामीलादेखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.
मनसेनंही व्यक्त केली होती नाराजी
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं ते अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे असं अमेय खोपकर यांनी म्हटलं होतं. याशिवाय, 2015 मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता.