आज भाऊबिजेसह पाडवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 01:02 AM2020-11-16T01:02:57+5:302020-11-16T01:03:16+5:30
दीपोत्सव पर्वातील दोन महत्त्वाचे सण दिवाळी पाडवा आणि भाऊबीज सोमवारी (दि. १६) होणार आहेत. तसेच शासन निर्णयानुसार मंदिरे खुली होणार असल्याने सोमवारी सर्वप्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी रीघ लागण्याची शक्यता आहे.
नाशिक : दीपोत्सव पर्वातील दोन महत्त्वाचे सण दिवाळी पाडवा आणि भाऊबीज सोमवारी (दि. १६) होणार आहेत. तसेच शासन निर्णयानुसार मंदिरे खुली होणार असल्याने सोमवारी सर्वप्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी रीघ लागण्याची शक्यता आहे. हिंदू संस्कृतीत भाऊबिजेच्या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळण्याची परंपरा आहे. भावाने बहिणीच्या घरी जातांना तिला वस्त्रालंकार किंवा अन्य भेट देण्याची प्रथा आहे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही अन्य बहिणीकडे जावे. तसेच महिलेला भाऊ नसल्यास किंवा दूरदेशात भाऊ असल्याने तो येणे शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे. त्यामुळे बहीण-भावाच्या प्रेमाची देवाणघेवाण होऊन एकमेकांविषयीचा कृतज्ञताभाव जागृत होण्यासाठी भाऊ आणि बहीण भाऊबीज साजरी करतात. तसेच पाडव्याच्या निमित्तानेदेखील पत्नीला पती भेटवस्तू देत असतो. त्यामुळे सोमवारचा दिवस महिलांसाठी पत्नी आणि बहीण अशा दोन्ही नात्यांमध्ये भेटवस्तू मिळण्याचा दिवस ठरणार आहे. मंदिरांमध्ये नागरिकांकडून सकाळपासूनच दर्शनासाठी रीघ लागण्याची चिन्हे आहेत. यंदा सांस्कृतिक कार्यक्रम नसल्याने मंदिरांमध्ये देवदर्शनास अधिक प्रमाणात रसिक येण्याची शक्यता गृहित धरून मंदिरांकडून नियोजन केले जाणार आहे.
इन्फो
यंदा नाही सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
दरवर्षी पाडवा पहाट, सांजपाडवा असे कार्यक्रम पाडव्याच्या दिवशी, तर भाऊबिजेच्या निमित्तानेेदेखील गायनाचे विविध कार्यक्रम होत असतात. मात्र, यंदा शासनाने या कार्यक्रमांना परवानगी दिलेली नसल्याने यंदा हे कार्यक्रम होऊ शकणार नसल्याची खंत रसिकांना जाणवत आहे.