पदन्यासाचा ‘सृजन’ नृत्याविष्कार
By Admin | Published: June 25, 2017 12:10 AM2017-06-25T00:10:46+5:302017-06-25T00:35:10+5:30
नाशिक : ‘होरी खेलत हे गिरीधारी’, ‘बाजे रे मुरलीयाँ’ यांसह ठुमरी आणि विविध भजनांवर आधारित भव्य कथक नृत्याविष्कार शनिवारी (दि. २४) रसिकांनी अनुभवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘होरी खेलत हे गिरीधारी’, ‘बाजे रे मुरलीयाँ’ यांसह ठुमरी आणि विविध भजनांवर आधारित भव्य कथक नृत्याविष्कार शनिवारी (दि. २४) रसिकांनी अनुभवला. निमित्त होते जनस्थान व्हॉट््स अॅप ग्रुपच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘सृजन’ या नृत्याविष्काराचे. प. सा. नाट्यगृह येथे आयोजित ताल, नाद, लय यांचा मिलाफ असलेल्या या ‘सृजन’ या नृत्याविष्कारात विद्या देशपांडे, सुमुखी अथणी आणि कीर्ती भवाळकर यांनी सादर केलेल्या कथक नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात सुमुखी अथणी यांनी सादर केलेल्या ‘एक दंत गजाननम्’ या गणेशवंदनेने झाली. यानंतर कीर्ती भवाळकर यांनी ‘वंदे शिवम् सुंदरम्’ या शिववंदनेतून भगवान शंकराला नमन केले, तर विद्या देशपांडे यांनी ‘मे तो एक निरंतर धाऊजी’ या गुरूवंदनेतून आपल्या गुरूं प्रती आदर व्यक्त केला. यानंतर सुमुखी अथणी आणि त्यांच्या शिष्याने ‘सरगम’ या नृत्यातून रसिकांना अनोखी जुगलबंदी अनुभवायला मिळाली. सृजन नृत्याविष्कार उत्तरोत्तर रंगत असताना कीर्ती भवाळकर यांच्या शिष्यांनी ‘होरी खेलत हे गिरीधारी’ या होरी नृत्यातून कृष्ण आणि गोपिका यांची क्रीडा रंगमंचावर सादर करण्याचा प्रयत्न केला. यानंतर विद्या देशपांडे यांच्या शिष्यांनी ताल प्रस्तुती पेश केली आणि या नृत्यावर सादर झालेल्या श्रवणीय पदन्यासावर संपूर्ण रंगमंचाने ठेका धरत शिष्यांचा उत्साह दुणावला तसेच यावेळी ‘वेतु बोले आयी मोरा रे’ या कजरी नृत्यातून वरुण राजाला साकडेदेखील घालण्यात आले. यानंतर ‘वृंदावन कुंज भवन’ हे भजन आणि ‘आरोह’ एक नृत्याविष्काराचे सुमुखी अथणी यांनी सादरीकरण केले. विद्या देशपांडे यांनी ‘दक्षयज्ञ’या नृत्याविष्कारातून ‘शिव-पार्वती’ यांच्या जीवनावरील प्रसंग आपल्या नृत्यातून दाखविला. कलाकारांना सुभाष दसककर (संवादिनी), नितीन पवार (तबला), मोहन उपासनी (बासरी), अद्वय पवार, सुनील देशपांडे यांनी साथसंगत केली. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘जनस्थान महोत्सवाची’ शनिवारी सृजन नृत्याविष्काराने सांगता झाली. सूत्रसंचालन अपर्णा क्षेमकल्याणी यांनी केले.