पगारे यांच्या प्रदर्शनाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 01:41 AM2019-11-02T01:41:56+5:302019-11-02T01:42:13+5:30
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेले नैसर्गिक व इतर विविध प्रकारचे छायाचित्र तसेच समाजभिमुख बातम्यांच्या कात्रणांच्या प्रदर्शनाला शुक्रवारपासून (दि.१) नाशिकरोडला प्रारंभ झाला.
नाशिक : ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेले नैसर्गिक व इतर विविध प्रकारचे छायाचित्र तसेच समाजभिमुख बातम्यांच्या कात्रणांच्या प्रदर्शनाला शुक्रवारपासून (दि.१) नाशिकरोडला प्रारंभ झाला.
विपश्यना विद्या प्रसारक समाज नाशिकचे अध्यक्ष अॅड. एम. एस. पगारे यांनी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेली छायाचित्रे व बातम्यांच्या कात्रणांचे प्रदर्शन स्टार झोन मॉलमधील पु.ना. गाडगीळ अॅण्ड सन्सच्या आर्ट गॅलरीमध्ये भरविले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रविणा दुसाने होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सक्तीदीदी, अॅड. एम.एस. पगारे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर प्रदर्शन दि. १३ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते ८ वाजेपर्यंत विनाशुल्क बघण्यासाठी खुले राहणार आहे.
समाजात जे शिकायला मिळाले त्या अनुभवाचे संचित समाजाला दिले पाहिजे या भावनेने पुढील पिढीस दिशादर्शक ठरेल, असे प्रदर्शन भरविण्याचे काम अॅड. पगारे यांनी केल्याचे गौरवोद्गार यावेळी अग्रवाल यांनी काढले तर आपली ओळख आपला हुद्दा, पद नसून आत्मा आहे. आत्म्याला समजलो तर परमात्म्याला व संपूर्ण जगाला समजलो असे ब्रह्माकुमारी सक्तीदीदी यांनी यावेळी सांगितले. अॅड. पगारे यांनी निसर्ग हा प्रत्येक मनुष्याच्या शरीरात आहे. भगवान बुद्धाची जीवन जगण्याची कला म्हणजे ‘धम्म’ असून ते आपल्याला समजले, आचरणात आणले तर जीवन सफल होईल. भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, साधू-संत हे निसर्गाच्याच सान्निध्यात राहत होते. तेव्हा निसर्गापासून दूर जाऊ नका, असा संदेशही त्यांनी दिला.
सूत्रसंचालन संतोष जोपूळकर यांनी केले. यावेळी पूजा गोसावी, सुशीला जोपूळकर, निर्मला पाटील, मीना वाघमारे, अॅड. प्रदीप गोसावी आदी उपस्थित होते.
८० वर्षे वयाच्या अॅड. एम. एस. पगारे यांनी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित निसर्ग व मानव संबंधावर आधारित छायाचित्रे तसेच सकारात्मक व दिशादर्शक बातम्यांची कात्रणे संकलित केली असून, त्याचेच प्रदर्शन भरविले आहे. निसर्गापासून लांब जाऊ नका, तर त्याचे संवर्धन करा, असा संदेश देण्यासाठी त्यांनी सदर प्रदर्शन भरविले आहे.