छावणी बोर्डावर नियुक्तीसाठी कार्यकर्त्यांमध्ये पैजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:13 AM2021-04-06T04:13:31+5:302021-04-06T04:13:31+5:30
देवळाली छावणी परिषदेत भारतीय जनता पार्टीचे मागील पंचवार्षिक निवडणुकीत स्पष्ट बहुमत होते. त्यामुळे त्यांना सहा वर्षांच्या कार्यकाळात जास्तीत ...
देवळाली छावणी परिषदेत भारतीय जनता पार्टीचे मागील पंचवार्षिक निवडणुकीत स्पष्ट बहुमत होते. त्यामुळे त्यांना सहा वर्षांच्या कार्यकाळात जास्तीत जास्त कामे करीत थेट नियुक्तीसाठी यापैकी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचे कट्टर समर्थक संजय गोडसे, अनिता जगदीश गोडसे, तानाजी भोर, चंद्रकांत गोडसे तर भाजपच्या प्रितम आढाव, सचिन ठाकरे, बाबूराव मोजाड, आरपीआयचे विश्वनाथ काळे यांच्यापैकी तीनच नावे अंतिम म्हणून पाठवली असल्याची चर्चा असली तरी सरंक्षण विभागाकडून मागील वर्षी देशभरातील निवडणुकींसाठी होणारा सोपस्कार पूर्ण करण्याचा सपाटा सुरू आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे थेट निवड की निवडणुका यावरच राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे. थेट नियुक्तीमध्ये लष्करी अधिकाऱ्यांशी परिचित असलेले सायरस पिठावाला यांचीही निवड होण्याची शक्यता जास्त वर्तविण्यात येत असून माजी उपाध्यक्ष बळवंत गोडसे, दिनकर पाळदे, सुनंदा कदम, भगवान कटारियायासह व्यावसायिक बसंत गुरूनानी हेही प्रबळ दावेदार असल्याने नक्की कोणाचे नाव अंतिम होऊन जाहीर होते याकडेच देवळालीवासीयांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी थेट नियुक्तीसाठी अठ्ठावीस इच्छुकांनी अर्ज केले. त्यापैकी चौदा जणांनी थेट नियुक्तीसाठी खासदारांचे शिफारस पत्र घेतले. शिफारस पत्र घेणाऱ्यांनी तर आपलीच निवड होणार असे एकमकांना सांगितल्याने त्या चौदातून कोणाची निवड होते का याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. तर भाजपा समर्थकांमध्ये नगरसेवकांमध्ये प्रदेश कार्यकारिणी कोणाच्या निवडीचा निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. एका भाजपा समर्थकाकरिता थेट खासदार उदयनराजे भोसलेंनी पक्षाच्या नेतृत्वाकडे शब्द खर्च केल्याने त्या समर्थकाची निवड अंतिम मानली जात आहे.