बालपत्रकारांनी मांडल्या व्यथा :दप्तराच्या ओझ्याने दुखते पाठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:57 AM2017-11-14T01:57:04+5:302017-11-14T01:58:57+5:30
‘दप्तराचं ओझं तर खूपच असतं ओ काका.. पाठ अन् खांदेही दुखतात.. पण करणार काय?’ - अशी व्यथा बालदिनाच्या पूर्वसंध्येला बालपत्रकारांनी ‘लोकमत’कडे मांडली नुसती व्यथाच मांडली असे नाही, तर ‘दप्तराचे ओझे’ या समस्येवर उपायदेखील सुचविले. बालकल्पनांमधून पुढे आलेले हे उपाय भन्नाट आणि विचार करायला लावणारे असेच आहेत.
नाशिक : ‘दप्तराचं ओझं तर खूपच असतं ओ काका.. पाठ अन् खांदेही दुखतात.. पण करणार काय?’ - अशी व्यथा बालदिनाच्या पूर्वसंध्येला बालपत्रकारांनी ‘लोकमत’कडे मांडली नुसती व्यथाच मांडली असे नाही, तर ‘दप्तराचे ओझे’ या समस्येवर उपायदेखील सुचविले. बालकल्पनांमधून पुढे आलेले हे उपाय भन्नाट आणि विचार करायला लावणारे असेच आहेत. काही बालपत्रकारांनी शाळा व्यवस्थापनाने मुबलक प्रमाणात शुद्ध पिण्याचे पाणी पुरविले तर दप्तरात तासन्तास घरून आणलेली पिण्याच्या पाण्याची बाटली सांभाळावी लागणार नाही असे सांगितले, तर काहींनी पाठ्यपुस्तकांच्या तासिकांबरोबरच दररोज खेळांच्या तासिकांचाही समावेश वेळापत्रकात करून योग्य नियोजनाची आखणी केल्यास पाठ्यपुस्तके कमी आणावी लागतील, असेही सांगितले.
काही बालमैत्रिणींनी तर चक्क पाठ्यपुस्तकांपैकी विविध विषयांची पुस्तके थेट शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना पुरवावी आणि शाळा सुटण्याअगोदर आपआपल्या वर्गांमध्ये पुस्तकांच्या कपाटात पुस्तके ठेवण्याची शिस्त लावावी, असा उपायही सुचविला. तसेच काही शाळकरी मुलांनी तर आपआपसामधील समजूतदारपणा वाढवून मित्र-मैत्रिणींनी दिवसानुसार विषयानुरूप पाठ्यपुस्तकांच्या तासिका आणाव्यात, असेही सुचविले. एकूणच ‘लोकमत’ने दिलेल्या महापत्रकाराच्या संधीचा बालमित्रांनी पुरेपूर फायदा घेत आपल्या समस्या ‘लोकमत’ व्यासपीठावर मांडल्या. त्यांच्या या समस्या प्रशासनाला विचार करायला लावणाºया आहेत. ओझ्यामुळे अधिक थकवा येतो आणि त्याचा परिणाम मानसिकतेवर होतो. त्यामुळे अभ्यासामध्येही मन लागत नाही, असे पूर्वा चौधरी हिने सांगितले.
वर्गनिहाय पुस्तकांची कपाटे उपलब्ध करून देत त्यामध्ये पुस्तके ठेवण्याची सवय लावल्यास दप्तरातून पुस्तकांचे ओझे आपोआप कमी होईल, असे मत प्रतीक्षा काकडने व्यक्त केले. दप्तराचे ओझे कमी होईल पण ते कधी, जेव्हा शाळा मुलांसाठी शुद्ध स्वरूपाचे पाणी पिण्यासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध क रून देईल तेव्हा, असे मुग्धा थोरात म्हणाली. आजच्या युगात जर शाळांनी आपल्या परिसरात सकस व पौष्टिक आहार आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तर बाटली आणण्याची गरज भासणार नाही, असे निशा भदाणे हिचे म्हणणे आहे. शिक्षकांनी दैनंदिन तासिकांमध्ये तोंडी शिक्षणावर भर द्यावा. लिखाणकामावर कमी भर दिल्यास वह्या जास्त आणण्याची गरज भासणार नाही, असा उपाय अमिषा डावरे हिने सुचविला. दप्तराच्या ओझ्याने आमची पाठ तर कामातून जातेच पण थकायलाही होते. सायंकाळी उत्साहदेखील राहत नाही. शाळेने वर्गात वह्या-पुस्तकं ठेवायला कपाटांची सोय करावी. त्यासाठी लागणारे कुलूप हवे तर आम्ही स्वखर्चाने आणू, असे मंजिरी पाटीलने सांगितले. ओझे असणार हे आम्हाला मान्यच आहे. पण त्याचे व्यवस्थापन केले जाऊ शकते. पालक सभांमध्ये वर्षाच्या सुरुवातीलाच हा विषय पुढे आला पाहिजे, असे मृणालिनी पाटील म्हणाली. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळेत दोन विद्यार्थी मिळून एक टॅब घेऊ शकतो. त्यामुळे अभ्यासात सुलभता येईल, असा उपाय अरजित कोरडे याने सुचविला, तर कॅँटिनमध्येच रोज चांगले जेवण दिले तर डब्याचे ओझे कमी होऊ शकेल, असे श्रुती पाटील म्हणाली. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी एकाच बेंचवर बसणारे दोन विद्यार्थी एकच पुस्तक वापरू शकतात. म्हणजे त्यांनी दिवसभरातील तासांची पुस्तके आपापसात ठरवून आणावीत, असा उपाय श्वेता मोघे हिने सांगितला. महाविद्यालयालयीन जीवनात ज्याप्रमाणे सेमिस्टर अर्थात सत्र पद्धत असते तशी शाळेतही असावी जेणेकरून पुस्तकांचे आकार व वजन बदलेल, असे नेहा कोठावदे म्हणाली. अभ्यासाचे ओझे हा अपरिहार्य विषय असला तरी लॅपटॉप, टॅब्लेटसारखी आधुनिक गॅझेट्स वापरून त्यावर उपाय करता येऊ शकेल. ही गॅझेट्स बनविणाºया कंपन्यांनी विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या किमतीत द्यावी, असे सानिया अन्सारी हिने सांगितले. पुस्तके घरीच ठेवायला सांगावी आणि प्रोजेक्टरद्वारे संबंधित धडा वर्गात सादर करावा, असा उपाय वैदेही शिरासने सुचविला.