उमेदवारांच्या प्रचाराने रंगत
By Admin | Published: March 23, 2017 12:58 AM2017-03-23T00:58:40+5:302017-03-23T00:58:53+5:30
नाशिक : चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंग भरायला सुरुवात झाली आहे.
नाशिक : चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंग भरायला सुरुवात झाली आहे. या निवडणूक रिंगणात नव्याने उतरलेल्या जनस्थान या कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांच्या पॅनलने बुधवारी (दि. २२) आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. जनस्थान या व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन असलेल्या अभय ओझरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या रिंगणातील जनस्थान पॅनलच्या उमेदवारांनी बुधवारी सकाळी ग्रामदैवत कालिका देवीचे दर्शन घेऊन टिळकवाडी येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे शहरातील साहित्यिकांच्या मार्गदर्शनाने निवडणूक प्रचाराच्या दृष्टीने आपले पहिले पाऊल टाकले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलेचे नऊ रंग असणाऱ्या लेखक, साहित्यिक आदिंबरोबर प्रत्येक उमेदवाराने प्रचारास सुरुवात केली आहे. प्रचार उद्घाटनादरम्यान जनस्थान पॅनलमधील उमेदवारांसह नरेश महाजन, श्याम पाडेकर, आनंद ढाकीफळे, बाबा आदम मुल्ला, जावेद शेख, प्राजक्त देशमुख यांच्यासह जनस्थान ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. या निवडणुकीतील अन्य ‘ग्रंथमित्र पॅनल’ कडून गुरुवारी (दि. २३) प्रचाराचा प्रारंभ करण्यात येणार आहे. वाचनालयाच्या आवारात ग्रंथपूजनाने या पॅनलच्या प्रचारास सुरुवात करण्यात येणार आहे. प्रचाराला प्रारंभ झाला असला तरी सोशल माध्यमातून जोर धरलेल्या प्रचाराने निवडणूक चिन्ह आणि अनुक्रमांक प्राप्त झाल्यानंतर मात्र उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेट घेण्यावर भर दिला आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता यावे यामागणीसाठी उच्च न्यायालयात आणि त्यानंतर धर्मादाय आयुक्तांच्या कोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर बुधवारी (दि. २२) वाचनालयाचे काळजीवाहू अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी धर्मादाय आयुक्तांना दि. ९ आणि २० मार्च रोजी सादर केलेल्या अर्जांची वेगवेगळी सुनावणी करण्याची मागणी केल्यानंतर या प्रकरणी आता शुक्रवारी (दि. २४) धर्मादाय आयुक्तांकडून निर्णय येणे अपेक्षित आहे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी बुधवारी (दि. २२) धर्मादाय आयुक्तालयात उपस्थित राहून आपले म्हणणे शुक्रवारी लेखी स्वरूपात सादर करणार आहेत. (प्रतिनिधी)
समित्यांना पुरविली बनावट कागदपत्रे
सार्वजनिक वाचनालयाचे प्रकरण न्यायालयात गेल्याने वाचनालयातील व्यवहारांची चौकशी करण्यात यावी यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी अॅड. नागनाथ गोरवाडकर अध्यक्ष असलेल्या समितीची नेमणूक केली परंतु वाचनालयाच्या अध्यक्षांनी नेमलेल्या समितीचा अहवाल निव्वळ औरंगाबादकरांच्या सोयीचा नसल्याने त्यांनी फेटाळला असल्याचे मत मिलिंद जहागिरदार यांनी व्यक्त केले आहे. गोरवाडकर समितीला पुरविण्यात आलेली अनेक कागदपत्रे ही बनावट, मागील तारखा टाकून केलेली तसेच संबंधितांच्या सह्या नसलेली, आवक जावक क्रमांकांमध्ये खाडाखोड असलेली कागदपत्रे उघडकीस आल्याचेही जहागिरदार यांनी म्हटले आहे. गोरवाडकर समितीच्या अहवालाबरोबर त्याच्याशी संबंधित इतर कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली असून, गोरवाडकर समितीच्या ज्या बैठका झाल्या त्याची इतिवृत्ते असून, या इतिवृत्तांचा अभ्यास केल्यावर औरंगाबादकरांचा खोटारडेपणा उघडकीस आला आहे तसेच हा खोटारडेपणा समितीने अधोरेखित केला आहे. औरंगाबादकरांच्या भोळ्या भाबड्या मुखावट्यामागील कारस्थानी चेहरा आता समोर आला आहे आणि यापुढेही अनेक खोट्या गोष्टी समोर येणार आहेत. - मिलिंद जहागिरदार, माजी कार्यवाह, सावाना