मानवतेच्या रक्षणार्थ रंगकर्मी सदैव सज्ज : प्रेमानंद गज्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:02 AM2019-07-25T01:02:10+5:302019-07-25T01:02:34+5:30
समाजातील मानवता तत्त्वाच्या रक्षणार्थ रंगकर्मी आणि रंगभूमी सदैव सज्ज असते. कलाकृतीतून मांडलेल्या दृष्टीकोनातून ठाम राहणे हीच खरी कलावंतांची ताकद असते, असे प्रतिपादन प्रख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी केले.
नाशिक : समाजातील मानवता तत्त्वाच्या रक्षणार्थ रंगकर्मी आणि रंगभूमी सदैव सज्ज असते. कलाकृतीतून मांडलेल्या दृष्टीकोनातून ठाम राहणे हीच खरी कलावंतांची ताकद असते, असे प्रतिपादन प्रख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी केले. त्याआधी अष्टपैलू कलाकार संतोष पवार यांना ‘मधुकर तोरडमल स्मृती चतुरस्त्र रंगकर्मी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
रंगमंच मुंबई, अमेय, तोरडमल परिवार आणि रवींद्र ढवळे अमृतमहोत्सव समिती यांच्यातर्फेपरशुराम साईखेडकर नाट्यमंदिरात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अमेय संस्थेच्या अपर्णा प्रभू, शर्मिला तोरडमल, निर्माते रमेश तलवारे, नंदकुमार देशपांडे, ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र ढवळे, रंगमंचचे प्रमुख उपेंद्र दाते उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना गज्वी म्हणाले की, संतोष पवार हा तोरडमल यांच्यासारखाच उत्स्फूर्त कलावंत असून शाहीर साबळे यांच्या हाताखाली तयार झालेली माणसे चतुरस्त्र आहेत.
पुरस्कार सोहळ्यानंतर संतोष पवार यांनी, चतुरस्त्र कलाकार म्हणून मिळालेला हा पुरस्कार समाधान देणारा असल्याचे सांगितले. मी कोणतीही गोष्ट ठरवून केली नाही. केवळ शाहीर साबळेंकडे महाराष्टÑाची लोकधारा करायला गेलो आणि सारे काही आपोआप जमत गेल्याचे सांगितले. प्रास्ताविक उपेंद्र दाते यांनी केले. सूत्रसंचालन अदिती मोराणकर यांनी तर आभार राजेश टाकेकर यांनी मानले.
राज्यकर्त्यांपासून सावध रहावे
अनेक कलाकृतींच्या निर्मितीवर आक्षेप घेतले जातात, पण जे आक्षेप घेतात त्यांना मुळात नाटकातले काही कळतही नसते. भविष्यातदेखील कलाकृतींच्या निर्मितीवर संकटे येतच राहतील. जगविख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन यांनादेखील हा देश सोडून जाण्यास भाग पाडले गेले होते. मात्र, त्यांनी त्यांच्या काढलेल्या चित्रांबाबत कधीही माफी मागितली नाही. आपले स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर राज्यकर्त्यांपासून सावध राहिले पाहिजे, असेही गज्वी यांनी नमूद केले.