कादवा कारखान्याच्या निवडणूक प्रचारात रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 10:56 PM2022-03-27T22:56:35+5:302022-03-27T22:56:35+5:30
दिंडोरी : कादवा कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात रंगत वाढली असून, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. माघार व निशाणी वाटप प्रक्रिया झाल्यानंतर उच्च न्यायालयाने अर्ज वैध ठरविलेल्या तीन उमेदवारांना पॅनल निशाणी न मिळाल्याने त्यांनी माघार घेतली.

केंद्र सरकार नेहमी सहकार क्षेत्रासाठी पुढाकार घेत असून, त्यामुळेच सहकार मंत्रालयाची स्थापना केली. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. कादवा महत्त्वाचा कारखाना असून, शेतकऱ्यांच्या विकासाला सभासदांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी ॲड. बाजीराव कावळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले, भाऊलाल तांबडे, दिलीप जाधव, बाळासाहेब दिवटे, प्रवीण जाधव, नितीन आहेर, उल्हास बोरस्ते, सुरेश देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी सुरेश डोखळे, सचिन बर्डे, नरेंद्र जाधव, माजी आमदार धनराज महाले, प्रवीण जाधव, नितीन आहेर, साहेबराव शिवले, संजय पाचोरकर यांचे भाषण झाले. यावेळी सभासद उपस्थित होते.
कादवा विकासच्या गावोगावी प्रचार सभा
कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांच्या कादवा विकास पॅनलच्या प्रचार सभा गावोगावी सुरू असून, विरोधकांच्या आरोपांचे खंडन करीत सभासदांना पुन्हा सत्ता देण्याचे आवाहन केले जात आहे. विधानसभा अधिवेशन आटोपताच विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ हे प्रचारात सक्रिय झाले आहेत.
सोशल वॉर
यंदाच्या निवडणुकीत समाजमाध्यमात सोशल वॉर जोरात रंगले असून, विरोधी गटाकडून विविध व्हिडिओ पोस्ट व्हायरल करीत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका केली जात आहे. दुसरीकडे सत्ताधारी गटाकडून त्यांचे खंडन करीत १४ वर्षांत केलेल्या कादवा विकासाचे व्हिडिओ टाकत मतदारांना साद घातली जात आहे.