...अखेर पालखेड डाव्या कालव्याला पाणी सोडले
By Admin | Published: August 20, 2016 12:34 AM2016-08-20T00:34:21+5:302016-08-20T00:36:35+5:30
...अखेर पालखेड डाव्या कालव्याला पाणी सोडले
येवला : पालखेड डाव्या कालव्यास पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेने केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यानुसार पाणीटंचाई म्हणून पालखेडच्या पाण्याने येवला तालुक्यातील सर्व बंधारे भरून देण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून शुक्र वारी दुपारी १ वाजता पाणी सोडले.
पालखेड डाव्या कालव्यास ओव्हरफ्लोचे पाणी मिळावे यासाठी शिवसेनेने उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. थेट महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षांकडेच हा प्रश्न उपस्थित केला होता. येवल्याचे पाणी पेटणार असल्याची चिन्हे दिसत असतानाच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना शिष्टमंडळाच्या उपोषणाची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांना पाणीटंचाई म्हणून येवला तालुक्यातील सर्व बंधारे भरून देण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. येवल्याला पालखेडचे पाणी रविवारी पोहोचणार आहे.
पालखेड डाव्या कालव्यास पाणी सोडावे यासाठी १४ आॅगस्टपासून शिवसेनेने येवल्याच्या पालखेड कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
पाणी सोडल्याशिवाय उपोषण सुटणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याने पालकमंत्री गिरीश महाजन व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी थेट निवासी जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांना याप्रश्नी तत्काळ लक्ष घालण्यास सांगितले. उपोषणकर्त्यांशीही चर्चा केली. नाशिक येथे १५ आॅगस्टला शिवसेनेच्या शिष्टमंडळाची जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली.
यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना पाणी सोडण्याबाबतचे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिले. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांनी १६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वा. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन, निवासी उप जिल्हाधिकारी रामदास खेडकर, अतिरिक्त उपजिल्हाधिकारी कान्होराज बगाटे, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी यांच्यासह उपोषणकर्ते शिवसेना नेते संभाजी पवार, सेना तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, वाल्मीक गोरे, साहेबराव सैद, शरद लहरे, अरुण काळे, धनंजय कुलकर्णी, रवि काळे, रतन बोरनारे, छगन अहेर, नाना पाचपुते यांनी चर्चेत भाग घेतला.
लाभ क्षेत्रातील ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे पिण्याच्या पाण्याची मागणी पंचायत समितीकडे करावी, असेही ठरले होते. ठरावानुसार पाणी सोडण्याचे आश्वासन शिवसेनेला दिले होते. पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रांतील टेलची चारी क्र मांक ५२ ला सर्वप्रथम पाणी देऊन बंधारे भरले जातील.
यानंतर टप्प्याटप्याने बंधारे भरण्याचे नियोजन असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी यांनी सांगितले. (वार्ताहर)