पालखेडच्या पाण्यापासून जनता वंचित !
By admin | Published: August 9, 2016 12:17 AM2016-08-09T00:17:03+5:302016-08-09T00:32:01+5:30
येवला : खंबीर नेतृत्वाचा अभाव, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
येवला : गेल्या चार वर्षांपासून पालखेडचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी येवला तालुक्याची हेळसांड होत आहे. या पाण्याच्या अभावामुळे शेतकरी पुरता संपला आहे. तालुक्यातील शेती हा विषय शाश्वत राहिलेला नाही. येवला दुष्काळी केंद्रस्थानी मानून जिल्ह्याात धरणांची निर्मिती करण्यात आली. परंतु खंबीर राजकीय नेतृत्वाच्या अभावामुळे पाण्याबाबत येवलेकरांना न्याय मिळाला नाही हे वास्तव आहे.
सुरगाणा, दिंडोरीसह धरणसमूह भागात पावसाचे प्रमाण वाढून धरणे ओव्हरफ्लो झाली. तरीही अभावेनेच पूरपाणी मिळते. मराठवाड्यासह जायकवाडीसाठी कादवा नदीतून पूरपाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येतोे. परंतु येवला तालुका मात्र पाण्यावाचून कायम तहानलेलाच आहे. तळकोकण म्हणून संबोधले जाणाऱ्या पेठ, दिंडोरी, सुरगाणा या क्षेत्रात वाघाड, करंजवन, चणकापूर, ओझरखेड, पुणेगाव ही धरणे व पालखेडचा बंधारा येतो. ही धरणेदेखील अभावानेच भरतात. यंदा पाऊस चांगला झाल्याने गेल्या चार वर्षांत प्रथमच पूरपाणी सोडले गेले. तरीही येवला तहानलेलाच आहे. शासन येवल्याच्या वतीने पाण्याच्या दुर्भिक्षाची बाजू मांडणार आहे किंवा नाही, असा सवाल शेतकरी करीत आहे. येवला केंद्रस्थानी मानून धरणांची निर्मिती झालेली असतानाही याचा फायदा केवळ नगर व मराठवाड्यालाच होत आहे. येवला मात्र तहानेने व्याकूळ असल्याची शोकांतिका आहे.
केंद्राचा नदीजोड प्रकल्पसंदर्भात क्रांतिकारी योजनेची घोषणा झाली खरी, परंतु त्यात नारपार प्रकल्पाचा समावेश नाही. पश्चिमवहिनी नद्या पूर्वविहनी म्हणून प्रवाहित करण्याची भूमिका घेऊन, प्रशासकीय मान्यतेसह अर्थसंकल्पीय तरतूद केली तर निश्चितपणे चांदवड, नांदगाव, येवला व मालेगाव या भागात शेतीसाठी त्याचा फायदा होणार आहे. परंतु सर्वेक्षण होऊनही हा प्रकल्प धूळ खात पडला आहे. नार-पारच्या उगमस्थानापासून अरबी समुद्र अगदी ५० ते ६० किमी अंतरावर आहे. बारमाही असलेल्या या नद्या थेट समुद्राला जाऊन मिळतात. त्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. रखडलेला मांजरपाडादेखील पूर्णत्वास जात नाही. केवळ पाऊण किलोमीटरचे बोगद्याच्या कामासह काही किरकोळ कामे बाकी आहेत. परंतु या कामाकडे कोणाला लक्ष देण्यासाठी वेळही नाही.
केंद्राने मदत देऊन हे काम पूर्ण करावे, अशी मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी थेट लोकसभेत केली असली तरी त्याच सततचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. अन्यथा येवल्यासह चांदवडमध्ये कायमच पाण्याचे दुर्भिक्ष राहणार आहे यात शंका नाही. पूरपाणी येवल्याला का नाही? याबाबत अधिकारीदेखील याचिका दाखल असल्याचे सांगून जायकवाडीचे आणि मराठवाड्याचे, पालखेड डाव्या कालव्याचा पाणी सोडण्याचा विषयच नसल्याचे म्हणत आहे. (वार्ताहर)