पालखी हेलिकॉप्टर की बसमधून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 11:05 PM2020-06-19T23:05:01+5:302020-06-19T23:07:08+5:30
नाशिक : आषाढी एकदशीनिमित्ताने दरवर्षी त्र्यंबकेश्वरमधून निघणारी संत निवृत्तिनाथ पालखी यंदा कशी निघणार याविषयी अद्यापही संभ्रमावस्था असल्याचे दिसून येते. ...
नाशिक : आषाढी एकदशीनिमित्ताने दरवर्षी त्र्यंबकेश्वरमधून निघणारी संत निवृत्तिनाथ पालखी यंदा कशी निघणार याविषयी अद्यापही संभ्रमावस्था असल्याचे दिसून येते. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून पालखी घेऊन जाण्याची संस्थानची मानसिकता असताना जिल्हा प्रशासनाने मात्र अद्याप परवानगी दिलेली नाही, तर उपमुख्यमंत्र्यांनी सुचविलेला हेलिकॉप्टरचा पर्यायही अंमलात येणे अशक्य असल्याने काहीशी निश्चितता निर्माण झालेली आहे.
आषाढी एकादशीच्या यात्रेवर यंदा कोरोनाचे सावट असल्याने यंदा काही ठिकाणाहून पालख्या कशा निघणार या विषयची चर्चा सुरू झाली आहे. यात्रेतील गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपायोजना करण्यात येत आहेत; त्याअनुषंगांना दोन बैठकादेखील मंत्रालयीन पातळीवर पार पडल्या आहेत. पालखी सोहळ्याला वारकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता पालखी शिवशाही बसमधून काढण्याचा पर्याय समोर आलेला आहे. मात्र बसमधून पालखी घेऊन जाताना भाविक रस्त्यातच बस अडवून पालखी पूजन करू लागले, तर मूळ उद्देशालाच हरताळ बसेल. त्यामुळे बसमधून पालखी घेऊन जाण्याचा निर्णय अंतिम करण्यात आलेला नाही.
गर्दीची शक्यता टाळण्यासाठी पालखी हेलिकॉप्टरमधून घेऊन जाण्याबाबतचा पर्यायदेखील उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत समोर आला होता. परंतु विविध ठिकाणांहून निघणाºया पालख्यांसाठी हेलिकॉप्टरचा पर्याय कितपत वस्तुनिष्ठ ठरू शकेल याविषयी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. हेलिकॉप्टरमधून मर्यादित वारकरी पालखीसोबत जातील त्यामुळे काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे. कोणत्याही एका पालखीसाठी एक निर्णय नव्हे तर सर्व पालख्यांसाठी सारखाच निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र पालखी बसमधून की हेलिकॉप्टरमधून हे अद्यापही ठरलेले नसल्याचे संस्थान पदाधिकाºयांनी सांगितले.
दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाला या संदर्भात विचारणा केली असता श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानकडून अद्याप बससंदर्भात कोणतीही विचारणा करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले. बसची मागणी करताच त्यांना बसची सुविधा पुरविण्याची तयारीदेखील महामंडळाने दाखविली आहे.