दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त पालखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:21 AM2021-08-17T04:21:54+5:302021-08-17T04:21:54+5:30

त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रावणातील दुसर्‍या सोमवारी (दि.१६) चांगलीच गर्दी केली होती. सलग सुट्ट्यांमुळे या दोन दिवसात ...

Palkhi for the second Shravan Monday | दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त पालखी

दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त पालखी

Next

त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रावणातील दुसर्‍या सोमवारी (दि.१६) चांगलीच गर्दी केली होती. सलग सुट्ट्यांमुळे या दोन दिवसात येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांनी हजेरी लावली होती.

कोरोनाच्या लाॅकडाऊनमधून बर्‍याच प्रमाणात सूट मिळाली तरी राज्यातील धार्मिकस्थळे अद्यापही बंद आहेत. आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वराचे मंदिर बंद असल्याने आलेल्या भाविकांना याही सोमवारी कळस दर्शनावर समाधान मानावे लागले.

भाविकांच्या म्हणण्यानुसार भगवान शिवशंकराच्या उपासनेच्या दृष्टीने श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिनाभर असंख्य भाविक देवदर्शन, जप, तप, विविध अनुष्ठान करतात. त्यामुळे शिवभक्त त्र्यंबकेश्वर येथे गर्दी करत असतात. मात्र कोरोनामुळे त्र्यंबकराजाचे मंदिर बंद आहे. त्यातच साेमवारी (दि.१६) मंदिर महाद्वारासमोर बॅरिकेडिंग करून भाविकांना मंदिराच्या दरवाजाजवळ येण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे भाविकांना दुरूनच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या कळसाचे दर्शनावर समाधान मानावे लागले.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जुना महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती, तर अनेक भाविकांनी ऋणमुक्तेश्वराचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने प्रदक्षिणेला बंदी घातली असली तरीही अनेक भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या मार्गावर दिसत होते.

दुपारी ३ वाजता पारंपरिक पद्धतीने भगवान त्र्यंबकराजाचा पालखी सोहळा संपन्न झाला. पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला होता. बॅण्डच्या तालावर पालखी कुशावर्त तीर्थावर आणण्यात आली. पालखी जवळ भाविकांनी गर्दी करू नये यासाठी देवस्थानच्या कर्मचार्‍यांनी दोरी लावून पालखी सभोवती साखळी तयार केली होती. पालखी मार्गावरील रहिवाशांनी पालखी मार्गावर सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. भाविकांना गर्भगृहातील पिंडीचे दर्शन झाले नसले तरी पालखी सोहळ्याप्रसंगी भगवान त्र्यंबकराजाच्या सुवर्ण मुखवट्याचे दर्शन घडले. यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. असंख्य भाविकांनी पालखी सोहळ्याचा लाभ घेतला.

कुशावर्त तीर्थावर एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पूजा अभिषेक करण्यात आला. आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात नेण्यात आली. या सोहळ्यात मंदिर संस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी, भूषण अडसरे, ॲड. पंकज भुतडा, संतोष कदम तसेच देवस्थान ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी, भाविक सामील झाले होते.

त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, उपनिरीक्षक अश्विनी टिळे तसेच ९ अधिकारी व ११० पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर तैनात होते.

फोटो - नं. 861 मंदिर 1) महाद्वारासमोर करण्यात आलेले बॅरिकेडिंग.

2) नं. ८६४ त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर झोळीमध्ये दान मागताना महिला भाविक.

3)नं. ८६५ मंदिरासमोर भाविकांनी केलेली गर्दी.

4)नं. ८६६ पालखी मार्गावर काढण्यात आलेली रांगोळी.

5)नं. 875 भगवान त्र्यंबकराजाचा पालखी सोहळा.

6) नं. 891भगवान त्र्यंबकराजाला पूजाभिषेक करताना पूजक नारायण फडके व सचिन दिघे

7) नं. 894 भगवान त्र्यंबकराजाला स्नानविधी करवताना मंगेश दिघे

8) नं. 897 पूजाविधी झाल्यावर भगवान त्र्यंबकेश्वराची आरती करताना.

9) नं. 901 पालखी सोहळा संपन्न झाल्यावर पंचमुखी सुवर्ण मुखवटा पुन्हा पालखीत ठेवताना.

Web Title: Palkhi for the second Shravan Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.