शिवशाही बसमधून जाणार पालखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 09:49 PM2020-05-18T21:49:16+5:302020-05-19T00:29:36+5:30
त्र्यंबकेश्वर : श्री सद्गुरु संत निवृत्तिनाथ महाराज याची पालखी दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा ज्येष्ठ कृष्ण-१ रोजी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. तथापि, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता दिंडी सोहळा स्थगित करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
त्र्यंबकेश्वर : श्री सद्गुरु संत निवृत्तिनाथ महाराज याची पालखी दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा ज्येष्ठ कृष्ण-१ रोजी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. तथापि, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता दिंडी सोहळा स्थगित करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. आता शासनाच्या आदेशानुसार आषाढ शुद्ध दशमीला शिवशाही बसमधून फक्त २० मानकरी पालखीसह पंढरपूरकडे रवाना होणार आहेत.
सोमवारी (दि.१८) विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आषाढीवारीसाठी यंदा संत निवृत्तिनाथांची पालखी पंढरपूरला जाणार किंवा नाही याबाबत वारकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था होती. मात्र, आता विश्वस्त मंडळाने शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सूचनेनुसार दिंडी सोहळा स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, २० मानकरी शिवशाही बसने पालखी घेऊन पंढरपूरला रवाना होणार आहेत.
सदर दिंडीचे दशमीला पंढरपूर येथे आगमन झाल्यानंतर दि. ३० रोजी मुक्काम व दुसºया दिवशी देवशयनी आषाढी एकादशीला पंढरपूर यात्रा दर्शनादी सोपस्कार पार पडल्यानंतर पुन्हा बसनेच त्र्यंबकेश्वरकडे प्रयाण करणार आहे. राज्य शासनाच्या सूचनांचा आदर करून विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाधी संस्थानचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा होते, तर विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, पंडितराव कोल्हे, रामभाऊ मुळाणे, पुंडलिकराव थेटे, जयंत गोसावी, योगेश गोसावी, ललिता शिंदे जिजाबाई लांडे, मधुकर लांडे, संदीप शिंदे आदी उपस्थित होते.
--------------------------
पालखीसमवेत जाणार २० मानकरी
पालखीसमवेत समाधी संस्थानचे मानकरी मनोहर महाराज बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, बाळासाहेब देहूकर महाराज, जयंत महाराज गोसावी आदींसह विश्वस्त मंडळ शिवशाही बसने जाणार आहेत. दरम्यान शासनाने शिवशाही बस उपलब्ध करून द्यावी. बसमध्ये फक्त २० प्रवासी असतील. तसेच बस समवेत पोलीस बंदोबस्त असावा अशीही मागणी शासनाकडे करणार असल्याचे पवनकुमार भुतडा यांनी सांगितले.