ठाणगाव जंगलातील पाणवठे कोरडेठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:49 AM2019-03-24T00:49:44+5:302019-03-24T00:50:15+5:30
ठाणगाव येथील वनविभागाच्या जंगलातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडल्याने या भागातील प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पाटोदा : ठाणगाव येथील वनविभागाच्या जंगलातील सर्वच जलसाठे कोरडेठाक पडल्याने या भागातील प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वनविभागाने या जंगलातील प्राण्यांसाठी पाणवठे तयार करावेत, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
येवला तालुक्यातील ठाणगाव येथे वनविभागाचे सुमारे साडेतीनशे हेक्टर जंगल असून, या जंगलात मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप, ससे, मोर यांसारखे प्राणी राहतात; मात्र यावर्षी भयाण दुष्काळाचा फटका या प्राण्यांना बसला आहे. त्यामुळे अन्न पाण्याच्या शोधात प्राण्यांची मानवी वस्तीकडे भटकंती वाढली आहे. मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात कुत्री असून, ही कुत्री या प्राण्यांवर हल्ला करीत असल्याने प्राणी जखमी होत असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. वनविभागाने या जंगलात पाणवठे तयार करून जंगली प्राण्यांसाठी सोय करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.