ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा योजना वीजबिलामुळे संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 03:40 PM2018-10-02T15:40:29+5:302018-10-02T15:41:00+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील पाचगाव नळपाणी पुरवठा योजनेचे वीजबील थकल्याने संकटात सापडण्याची चिन्हे आहे. दोन दिवसांत वीजबील न भरल्यास वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे फलक पंचायत समितीच्यावतीने ठाणगाव येथे लावण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील पाचगाव नळपाणी पुरवठा योजनेचे वीजबील थकल्याने संकटात सापडण्याची चिन्हे आहे. दोन दिवसांत वीजबील न भरल्यास वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे फलक पंचायत समितीच्यावतीने ठाणगाव येथे लावण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला आहे. तालुक्यातील ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून योजनेचे २३ लाख रूपयांच्या आसपास वीजबील थकल्याने योजनेचा वीज पुरवठा खंडीत होण्याच्या मार्गावर आहे. धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असतांनाही केवळ वीज बिल थकल्याने योजना बंद होते की काय असा प्रश्न ग्रामस्थांपुढे निर्माण झाला आहे. ठाणगाव जवळील उंबरदरी धरणाच्या पाण्यावर सदरची पाणीयोजना अवलंबून आहे . २००७ साली ही योजना सुरु झाली असून आजपर्यंत ही योजना बारामाही सुरळीत सरू आहे. योजनेत ठाणगाव, पाडळी, टेंभुरवाडी, हिवरे, पिंपळे आदी सह वाडया वस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेचे २३ लाख रुपये वीजबिल थकल्याने पंचायत समिती स्तरावरून योजनेतील सर्वच ग्रामपंचायतींनी दोन दिवसांत थकीत रक्कम जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. ग्रामपंचायतींनी आपल्या कडील थकीत रक्कम भरली नाही तर पाचगाव पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा बंद होणार असल्याचे फलक गावात लावण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ठाणगाव ग्रामपंचयतीकडून नळ धारकांचे घरोघरी जावून वसुलीसाठी प्रयत्न केले जात आहे. ग्रामस्थ व शेतकरी आपल्या कडील थकीत असणारी नळपट्टी थोडया फार प्रमाणात का होईना पण ग्रामस्थ स्व:ताहून पाणीपटटी भरताना दिसत आहे. योजनेत सहभागी गावामधून ठाणगाव ग्रामपंचायतीचा नेहमीच महत्त्वाचा सहभाग असल्याने वीजबिलाचा बोजाही या ग्रामपंचायतीवर सर्वाधिक आहे.