पंचामृत अभिषेकाने मांगीतुंगी येथे जैन कुंभमेळ्याला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2022 02:01 AM2022-06-16T02:01:41+5:302022-06-16T02:02:14+5:30
मांगीतुंगी पर्वतावरील भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट मूर्तीचा पहिला आंतरराष्ट्रीय महामस्तकाभिषेक महोत्सव तथा जैन कुंभमेळ्याला बुधवारी (दि. १५) मंत्रघोषात ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
सटाणा (जि. नाशिक) : मांगीतुंगी पर्वतावरील भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट मूर्तीचा पहिला आंतरराष्ट्रीय महामस्तकाभिषेक महोत्सव तथा जैन कुंभमेळ्याला बुधवारी (दि. १५) मंत्रघोषात ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
बुधवारी सकाळी ८ वाजता मांगीतुंगी पहाडावर चेन्नई येथील उद्योजक कमल जैन ठोलिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महोत्सवाला सुरुवात झाली. सकाळी १० वाजता ढोलताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करीत दिल्ली येथील संघपती अनिल जैन, गाजियाबादचे उद्योजक जम्बू प्रसाद जैन, विद्याप्रकाश जैन, सुरतचे उद्योजक संजय व अजय दिवाण, सर्वतोभद्र महलचे निर्माते लखनौ येथील नितीशकुमार जैन यांच्या हस्ते कलशाभिषेक करण्यात आला. या सोहळ्यात गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माता, आर्यिका श्री चंदनामती माता या ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रास मूर्तीनिर्माण कमिटी व महामस्तकाभिषेक महोत्सव समितीचे महामंत्री संजय पापडीवाल, कार्याध्यक्ष अनिलकुमार जैन, अधिष्ठाता सी. आर. पाटील, कोषाध्यक्ष प्रमोद कासलीवाल, मंत्री भूषण कासलीवाल, डॉ. जीवनप्रकाश जैन, विजयकुमार जैन, नरेश बन्सल, चंद्रशेखर कासलीवाल, राजेंद्र कासलीवाल, प्रदीप जैन, मनोज ठोळे आदींसह प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
---------------
इन्फो
१००८ लिटर दुधाने केला अभिषेक.......
महामस्तकाभिषेक महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सौभाग्यशाली भक्त परिवाराच्यावतीने महामस्तकाभिषेक करण्यात आला. यासाठी १००८ लिटर दूध त्याच्यात दही, केशर, सर्व वनौषधी, हरिद्रा, अष्टगंध मिसळण्यात आले. मूर्तीनिर्माण समितीच्यावतीने ड्रोनने भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
इन्फो.....
९५ वर्षांच्या पापडीवाल यांची उपस्थिती
भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीचे प्रमुख साक्षीदार डॉ. पन्नालाल पापडीवाल हे मूर्तीनिर्माण समितीचे तत्कालीन महामंत्री होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मांगीतुंगी पहाडावर अखंड पाषाण शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. डॉ. पन्नालाल पापडीवाल आज ९५ वर्षांचे असून त्यांनी सकाळीच पहाडावर जाऊन कार्यक्रमाला उपस्थिती लावली. गुरुवारी त्यांच्या व परिवाराच्या हस्ते भगवान ऋषभदेवांच्या मूर्तीला पंचामृत अभिषेक करण्यात येणार आहे.