पंचवटी परिसरात सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:57 AM2018-09-18T00:57:53+5:302018-09-18T00:58:13+5:30
परिसरात गेल्या आठवडाभरापासून सर्दी, खोकला तसेच तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याने नागरिक भयभीत झालेले आहेत. रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने परिसरातील रुग्णालयांत उपचारासाठी रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येत आहे.
पंचवटी : परिसरात गेल्या आठवडाभरापासून सर्दी, खोकला तसेच तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याने नागरिक भयभीत झालेले आहेत. रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने परिसरातील रुग्णालयांत उपचारासाठी रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येत आहे. एक वर्षाच्या बालकापासून ते ७० वर्षांच्या वयोवृद्धापर्यंत सध्या सर्वांनाच खोकला तसेच सर्दी या आजाराने ग्रासलेले असल्याने पंचवटीत तरी सध्या घराघरात एक तरी सर्दी तसेच खोकल्याचा रुग्ण आढळून येत आहे. सर्दी-खोकल्याची साथ असल्याने दिवसेंदिवस परिसरात रुग्णांची संख्या वाढत आहे.
सलग तीन ते चार दिवसांपासून सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्दी, खोकला, डोकेदुखी यामुळे नागरिक रक्त, लघवी तपासून मलेरिया किंवा अन्य साथीच्या आजाराची लागण तर झालेली नाही ना याची खात्री करून घेत आहेत. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्याने सर्वत्र नागरिकांची गर्दी होत आहे त्यातच खोकला, सर्दी यामुळे साथीचे आणखी आजार पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर वातावरणात अचानकपणे बदल होऊन त्याचा परिणाम शरीरावर झाल्यानेच सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. सध्या डेंग्यू तसेच स्वाइन फ्लूसदृश आजाराची लागण मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे गर्दीत जाणे टाळावे, कुठल्याही कार्यक्रमास गरज असल्यासच जावे. बोलताना साधारण प्रत्येकात एक मीटर अंतर पाहिजे. रुग्णाला खोकला आला तर तोंडातून इन्फेक्शन बाहेर जाण्याची शक्यता असते. महत्वाचे म्हणजे प्रत्येकवेळा साबणाने कोमट पाण्यात हात स्वच्छ धुवावेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दैनंदिन व्यायाम करावा. रूग्णाने वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. - डॉ. अरुण गुंजाळ