पंचवटी एक्सप्रेस डिस्कब्रेकला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:16 AM2021-03-23T04:16:16+5:302021-03-23T04:16:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : मनमाड - मुंबई पंचवटी एक्सप्रेसच्या डिस्कब्रेकने कसारानजिक अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. अग्निरोधकाच्या ...

Panchavati Express disc brake fire | पंचवटी एक्सप्रेस डिस्कब्रेकला आग

पंचवटी एक्सप्रेस डिस्कब्रेकला आग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : मनमाड - मुंबई पंचवटी एक्सप्रेसच्या डिस्कब्रेकने कसारानजिक अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. अग्निरोधकाच्या साह्याने तत्काळ ही आग विझविण्यात आल्याने अनर्थ टळला. रेल्वेच्या तांत्रिक सल्लागारांनी गाडी सुस्थितीत असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली. त्यामुळे गाडी अर्धा तास उशिरा मुंबईत पोहोचली.

मनमाडहून नाशिक रोडला निर्धारित वेळत पोहोचलेली पंचवटी एक्सप्रेस कसाऱ्याजवळील उंबरवाडी येथे आली असता, बोगी क्रमांक डी -११ येथील चाकातून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागल्याने जागरूक प्रवाशांनी तत्काळ चेन ओढून गाडी थांबवली. याबाबतची माहिती गाडीचे चालक आणि गार्डला देण्यात आल्यानंतर ते बोगीजवळ आले. तोपर्यंत चाकाच्या डिस्कब्रेकने पेट घेतल्याने सर्वांची धावपळ झाली. प्रवाशांनी आपल्याकडील पाण्याच्या बाटल्यांनी आग विझवण्याचा प्रयत्नही केला. नियमित प्रवासी सुलतान काझी शेख, रोहित वानखेडे, प्रा. विवेक पाटील तसेच देविदास पंडित यांनी नागरिकांकडून पाण्याच्या बाटल्या घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही आग आणि धूर येतच होता. प्रवाशांनी धावपळ न करण्याच्या सूचना देत त्यांना सुरक्षित एका बाजूला करण्यात आले.

गार्ड तसेच चालकांनी गाडीतील अग्निरोधक यंत्राच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवले. संपूर्ण गाडीची पाहणी करण्यात आल्यानंतर गार्डने तांत्रिक सल्लागारांशी चर्चा केल्यानंतर अर्ध्या तासाने गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान, डिस्कब्रेकला लागलेल्या आगीनंतर प्रवाशांनी संयम दाखवल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. पंचवटी प्रवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.

===Photopath===

220321\22nsk_3_22032021_13.jpg

===Caption===

  पंचवटी एक्सप्रेस डिस्कब्रेकला लागलेली आग

Web Title: Panchavati Express disc brake fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.