४६ दिवसांनंतर धावली पंचवटी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:11 AM2021-06-26T04:11:50+5:302021-06-26T04:11:50+5:30

नाशिकरोड : नाशिककर चाकरमान्यांना मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस शुक्रवारी ४६ दिवसांनंतर मुंबईच्या दिशेने ...

Panchavati Express runs towards Mumbai after 46 days! | ४६ दिवसांनंतर धावली पंचवटी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने!

४६ दिवसांनंतर धावली पंचवटी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने!

Next

नाशिकरोड : नाशिककर चाकरमान्यांना मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस शुक्रवारी ४६ दिवसांनंतर मुंबईच्या दिशेने धावली. यामुळे चाकरमान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, पूर्वीप्रमाणेच पंचवटी सर्व सोयीसुविधांसह तिच्या सर्व रेल्वेस्थानकावर थांबा घेऊन सुरू करावी, अशी मागणी दररोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे. शुक्रवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकातून २४६ प्रवाशांनी पंचवटीद्वारे मुंबई, ठाणे गाठले.

मुंबई - ठाणे परिसरात उद्योग, व्यवसाय, नोकरी, शिक्षण आदी कामांसाठी दररोज जाण्यासाठी नाशिककरांसाठी लाइफलाइन रेल्वे ठरली आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या १० मेपासून पंचवटी एक्स्प्रेस बंद करण्यात आली होती. राज्यराणी एक्स्प्रेसच्या मदतीने प्रवासी मुंबई, ठाण्याला जात होते. मात्र राज्यराणीची वेळ ही पंचवटीतून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांना योग्य नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. या गाडीला दादरचा थांबा नसल्याने प्रवाशांची अडचण झाली होती. मनमाड - मुंबई असलेली राज्यराणी एक्स्प्रेस आता नांदेड-मुंबई करण्यात आल्याने ती नांदेड येथूनच प्रवाशांनी भरून येते. त्यामुळे या गाडीत जागाही मिळत नाही. राज्यराणी एक्स्प्रेसला नाशिकचा वेगळा कोटा असला तरी पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेस बंद असल्याने राज्यराणीला नाशिक येथून जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली होती.

गेल्या ४६ दिवसांपासून बंद असलेली पंचवटी एक्स्प्रेस शुक्रवारी पुन्हा सुरू झाल्याने नाशिककर प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र शुक्रवारी गेलेली पंचवटी परतीच्या प्रवासाला नसल्याने बहुतांश प्रवाशांनी मुंबई, ठाणे जाणे टाळले. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून शुक्रवारी वातानुकूलित १४ व सेकंड क्लास २३२ असे एकूण २४६ प्रवासी मुंबई, ठाण्याला रवाना झाले. मासिक पास सवलत बंद असल्याने प्रवाशांची गर्दी रोडावली आहे तसेच आरक्षण तिकीट अनिवार्य केल्यानेदेखील प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे.

कोरोनामुळे पंचवटी एक्स्प्रेसचा कसारा थांबा रद्द करण्यात आल्याने शहापूर, खर्डी, आटगाव, भिवंडी, आसनगाव, मुरबाड, टिटवाळा, खडवली या भागात नोकरीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे पंचवटी एक्स्प्रेसचा कसारा थांबा सुरू करण्यासोबत सर्वसाधारण तिकीटदेखील अशी मागणी दररोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांकडून केली जात आहे. प्रवाशांची गर्दी कमी असल्याने २२ बोगीची असलेली पंचवटी एक्स्प्रेस एकूण सोळा बोगीची करण्यात आली आहे. पाच सर्वसाधारण बोगी व एक वातानुकूलित अशा बोगी कमी करण्यात आल्या आहेत.

---कोट--

१) पंचवटी एक्स्प्रेसच्या बोगी पूर्वीप्रमाणे ठेवून सर्वसाधारण तिकीट सुरू करण्यासोबत कसारा थांबा देण्याची गरज आहे. राज्यराणीची वेळ नोकरीच्या हिशोबाने गैरसोयीची ठरत असल्याने नाशिककरांसाठी पंचवटी एक्स्प्रेस ही अत्यंत महत्त्वाची आहे. - विठ्ठल गवे, प्रवासी, जेलरोड

२) राज्यराणी एक्स्प्रेसने दररोज मुंबईला जाणे वेळेनुसार सोयीचे होत नाही. त्यामुळे कार्यालयीन कामासाठी गेल्या दीड महिन्यापासून रस्तामार्गे मुंबईला जात होतो. परंतु आता पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाल्याने मोठी गैरसोय दूर झाली आहे. - नितीन जगताप, प्रवासी सिडको

३) पंचवटी एक्स्प्रेस मुंबई ठाण्याला दररोज अपडाऊन करण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. पंचवटी एक्स्प्रेस बंद केल्यामुळे रस्तामार्गे मुंबईला जाणार्‍यांचा उलट जास्त लोकांची संपर्क येत होता. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याची जास्त शक्यता आहे. - भीमराव सोनवणे, नाशिक

४) राज्यराणी एक्स्प्रेस ही ठाण्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसला थांबत असल्याने तेथे आम्हाला उतरून पुन्हा दादरला यावे लागत होते. त्यामुळे खूप गैरसोय होत होती. मुंबई, ठाण्याला नोकरीसाठी जाणाऱ्या महिलांसाठी पंचवटी एक्स्प्रेसच योग्य आहे. - आरती माळी, नाशिकरोड

===Photopath===

250621\25nsk_23_25062021_13.jpg

===Caption===

पंचवटी एक्सप्रेससाठी प्रवाशांची स्थानगात झालेली गर्दी

Web Title: Panchavati Express runs towards Mumbai after 46 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.