नाशिकच्या पंचवटीतील भाजीमंडईचा ताबा भिकाऱ्यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:33 AM2018-07-11T11:33:18+5:302018-07-11T11:42:20+5:30
भाजीमंडईत पुन्हा एकदा भिकाऱ्यांनी वास्तव्य
नाशिक/पंचवटी: महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून गंगाघाटावरील भाजीपाला विक्रेत्यांसाठी गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालयासमोर बांधलेल्या भाजीमंडईत पुन्हा एकदा भिकाऱ्यांनी वास्तव्य केले आहे. एकीकडे महापालिका सदर गाळ्यांचे लिलाव करणार असल्याचे जाहीर करीत असताना दुसरीकडे याच जागेचा भिकाºयांनी ताबा घेतल्याने भाजीमंडईची जागा नेमकी कोणासाठी? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वीच महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गंगाघाट परिसराला भेट देताना गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालयासमोर असलेल्या भाजीमंडईचीदेखील पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान भाजीमंडईत भाजीविक्रेत्यांऐवजी चक्क भिकारी तसेच बेघर नागरिकांनी आपले बस्तान मांडल्याचे चित्र पालिका आयुक्तांना दिसल्याने त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाºयांना सूचना देऊन भाजीमंडई स्वच्छ करून तेथील बेघर नागरिकांना हटविण्याची मोहीम राबविली होती. त्यानंतर पालिकेने भाजीमंडईच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक तैनात केले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरक्षारक्षक गायब झाल्याने गंगाघाट परिसरात फिरणाºया बेघर, भिकाºयांनी पुन्हा भाजीमंडईचा ताबा घेतल्याने परिसराला अवकळा आली आहे. पालिका प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष केल्याने भाजीमंडईला झोपडपट्टीचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालिकेने भाजीविक्रेत्यांसाठी उभारलेल्या भाजीमंडईत कोणत्याही प्रकारे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता मनपा अधिकाºयांनी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.