पंचवटी पोलीस ठाण्याचे पालटले रूपडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 12:01 AM2017-08-13T00:01:36+5:302017-08-13T00:03:04+5:30
पंचवटी : राज्यातील प्रथम आयएसओ मानांकन प्राप्त असलेल्या पंचवटी पोलीस ठाण्यातील वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या तसेच आवारात अस्ताव्यस्त पडलेला पालापाचोळा हटवून साफसफाई करण्यात आल्याने पंचवटी पोलीस ठाण्याला झळाळी प्राप्त झाली आहे. गत जुलै महिन्यातील शुक्रवार, दि़ २८ रोजी पंचवटी पोलीस ठाण्यातील दुरवस्थेबाबत ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त पोलीस ठाणे हेच का? या आशयाचे वृत्त प्रसारित केले होते़ या वृत्ताची दखल घेण्यात आली असून, पोलीस ठाण्याचा आवार चमकू लागल्याने पोलीस कर्मचाºयांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे़
आयएसओ मानांकन प्राप्त पंचवटी पोलीस ठाण्याची काही दिवसांपूर्वी दुरवस्था झाली होती़ पोलीस ठाणे आवारातील वाढलेल्या वृक्षांच्या फांद्यांमुळे पोलीस ठाण्याचा फलकही रस्त्यावरून दिसेनासा झाला होता़ तसेच पोलीस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या अपघातग्रस्त कार, पोलीस ठाणे आवारात पसरलेला पालापाचोळा यामुळे पोलीस ठाण्याला बकाल स्वरूप प्राप्त झाले होते़ याबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रसारित केले होते़
लोकमतमधील वृत्त तसेच पोलीस आयुक्तांनीही अपघातग्रस्त वाहने हटविण्याबाबत केलेल्या सूचनांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी दखल घेऊन संपूर्ण पोलीस ठाण्याच्या आवाराची साफ सफाई, झाडांचा साचलेला पालापाचोळा तसेच पोलीस ठाण्याच्या आवारात व बाहेर उभ्या असलेली अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम करून पोलीस ठाण्यातील बगीचा व कारंजाची सफाई करण्याचे काम करून घेतले आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याचे रस्त्याने जातानाही न दिसणारे फलक स्वच्छ करण्यात आले असून, थेट रस्त्यावरूनही पोलीस ठाणे सहजपणे दृष्टिक्षेपास पडते़ गत सलग चार ते पाच दिवसांपासून पोलीस ठाण्याच्या साफसफाईचे काम सुरू होते़ पोलीस ठाणे आवारातील धूळखात पडलेली ग्रीन जीमही स्वच्छ करण्यात आली असून, एक नवीन झळाळीच यामुळे प्राप्त झाली आहे़ याबरोबरच पोलीस ठाण्यात कामानिमित्त येणाºया नागरिकांना वाहने अस्ताव्यस्तपणे न लावता रांगेत लावण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत़