पंचवटी, राज्यराणी, गोदावरीला ‘इंटरसिटी’ दर्जा
By admin | Published: February 2, 2017 01:26 AM2017-02-02T01:26:42+5:302017-02-02T01:26:59+5:30
महाप्रबंधकांचा निर्णय : निर्धारित वेळेत चालविण्याची प्रशासनावर जबाबदारी
नाशिकरोड : नाशिककर चाकरमान्यांसह व्यावसायिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या पंचवटीसह गोदावरी व राज्यराणी या तिन्ही रेल्वेगाड्यांना मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी इंटरसिटीचा दर्जा दिल्याचे मंगळवारी (दि.३१) जाहीर केले. यामुळे या तिन्ही गाड्या निर्धारित वेळेत चालविण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनावर आली असून, नाशिककरांना दिलासा मिळणार आहे.
मनमाड जंक्शनवरून नाशिकरोडमार्गे मुंबईला दररोज ये- जा करणाऱ्या पंचवटी, गोदावरी, राज्यराणी या सुपर फास्ट एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना विविध कारणास्तव विलंब रेल्वे प्रशासनाकडून केला जात होता. तसेच अनेकदा कसारा किंवा इगतपुरीजवळ दुरांतो एक्स्प्रेसमुळे अनेकवेळा पंचवटीला साइड ट्रॅक करण्यात येत होते. यामुळे निश्चित वेळेत नाशिककरांच्या हक्काच्या असलेल्या तीनही रेल्वेंना मुंबईत पोहचण्यास अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती.
परिणामी चाकरमान्यांसह व्यावसायिक वर्गाला निर्धारित वेळेत मुंबईत दाखल होता येत नसल्याने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात होती.
तसेच अनेकदा प्रवाशांनी पंचवटीला होणाऱ्या विलंबामुळे आंदोलनेदेखील नाशिकरोड, इगतपुरी व मनमाड येथे केली आहेत. सदर समस्या कायमस्वरूपी निकाली काढली जावी, यासाठी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजीव फोकणे यांनी महाप्रबंधक शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.
तीनही गाड्यांना ‘इंटरसिटी’चा दर्जा मिळाल्यास निर्धारित वेळेत या गाड्या धावतील, असे मत निवेदनामध्ये मांडण्यात आले होते. एकूणच या तीनही गाड्यांना इंटरसिटीचा दर्जा दिल्याने आता निर्धारित वेळेमध्ये या गाड्या धावणार असल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)