मतमोजणीसाठी पंचायत समिती सज्ज
By admin | Published: February 23, 2017 12:35 AM2017-02-23T00:35:53+5:302017-02-23T00:36:11+5:30
कडक बंदोबस्त : दहा वाजेपासून मतमोजणी
नाशिक : तालुका पंचायत समितीच्या चार गट व आठ गणांसाठी गुरुवारी (दि.२३) मतमोजणी होणार असून, त्यासाठी नाशिक तालुका पंचायत समितीत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एका टेबलभोवती पाच कर्मचारी अधिकारी मतमोजणीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्र्यंबकेश्वर रोडवरील पंचायत समिती इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सभागृहात ही मतमोजणी प्रक्रिया गुरुवारी (दि.२३) सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. सर्व चार गट व आठ गणांचे निकाल दुपारी एक वाजेपर्यंत अपेक्षित आहे. २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानात नाशिक तालुक्यासाठी १ लाख २९ हजार ४२७ मतदारांपैकी ९१००५ मतदारांनी (७०. ३१ टक्के) मतदान केले होते. चार गटांसाठी १९ तर आठ गणांसाठी ४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. एकलहरे गटातून खासदार पुत्र अजिंक्य हेमंत गोडसे शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांच्यासमोर अपक्ष शंकर धनवटे तसेच कॉँग्रेसचे प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड हे उमेदवार आहेत. पळसे, गिरणारे व गोेवर्धन गटातही प्रामुख्याने तिरंगी लढतीची शक्यता आहे. पंचायत समिती सभापती पद सर्व साधारण असल्याने एकलहरे गटातील एकलहरे गण व गोवर्धन गटातील विल्होळी गणातून जे उमेदवार निवडून येतील, तेच सभापती पदावर दावा सांगतील, असे चित्र आहे. (प्रतिनिधी)