पंचवटीत धोकादायक वाडे, इमारतींचा धोका कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:43 AM2019-07-30T00:43:38+5:302019-07-30T00:43:56+5:30

पावसाळा सुरू होण्याअगोदर महापालिका महिनाभरापूर्वीच धोकादायक इमारती तसेच वाड्यांना नोटिसा देऊन कागदोपत्री आपली कारवाई पूर्ण करते, मात्र संबंधितांनी धोकादायक भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही.

 Panchayat hazardous castles, buildings always endangered | पंचवटीत धोकादायक वाडे, इमारतींचा धोका कायमच

पंचवटीत धोकादायक वाडे, इमारतींचा धोका कायमच

Next

पंचवटी : पावसाळा सुरू होण्याअगोदर महापालिका महिनाभरापूर्वीच धोकादायक इमारती तसेच वाड्यांना नोटिसा देऊन कागदोपत्री आपली कारवाई पूर्ण करते, मात्र संबंधितांनी धोकादायक भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही.
ऐन पावसाळ्यात वाडे तसेच धोकादायक इमारतींचा भाग कोसळल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागी होते व धोकादायक वाड्यांचा किंवा इमारतींचा जीर्ण भाग उतरविण्याचे काम करून वराती मागे घोडे याप्रमाणे करत असल्याचे दिसून येत आहे.
पंचवटी परिसरात यंदाच्या वर्षी पावसाळ्यात जवळपास तीन इमारतींचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वांत पहिली घटना (दि.५) सुकेणकर लेन येथे घडली. परिसरात ४० ते ४५ वर्षांपूर्वीची जुनी इमारत असलेल्या श्रीराम अपार्टमेंटचा जिना जीर्ण झाल्याने तो कोसळला होता या घटनेत दोनजण जखमी झाले होते, तर दोन ते तीन दिवसांनी मखमलाबाद नाक्यावर असलेल्या हेमकुंजजवळील हर्षवर्धन सोसायटीची तीन मजली इमारत (दि.८) मध्यरात्री कोसळली होती. त्यानंतर रविवारी (दि.२८) दुपारी शनिचौकातील पवार वाड्याची भिंत कोसळून दोघे बहीण-भाऊ जखमी झाले होते. सदर तिन्ही घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. घटनास्थळी धाव घेत त्यांनी वाड्यातील तसेच इमारतीतील रहिवासीयांना तत्काळ घटनास्थळाहून सुरक्षितस्थळी हटवून त्यांची अन्यत्र मनपाच्या इमारतीत राहण्याची व्यवस्था केली होती.
दरवर्षी पावसाळ्यात एखाद्या वाडा किंवा धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्यानंतर प्रशासन घटनास्थळी जाऊन उरलेला धोकादायक भाग उतरवून घेण्याची कार्यवाही करते, मात्र हीच तत्परता प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी दाखवून किंवा धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्यानंतर लागलीच कारवाई केली तर जुने वाडे तसेच इमारतींचा भाग पावसाळ्यात कोसळून जखमी होण्याची घटना टाळता तर येईलच शिवाय पावसाळ्यापूर्वी धोकादायक भाग उतरवून घेतला तर पावसाळ्यात पडझड होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.
प्रशासनाची उदासीनता
प्रशासन दरवेळी उदासीनता दाखविते पावसाळ्यात केवळ नोटिसा बजावण्याचे काम करत कागदोपत्री आपली जबाबदारी पार पाडते. नोटिसा बजावल्यानंतर त्या धोकादायक वाडे किंवा घरांचा भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही किंवा दखल घेत नाही हे दिसून येते त्यामुळे पावसाळ्यात इमारतीचा भाग कोसळल्यावर प्रशासन वराती मागून घोडे याप्रमाणे धोकादायक भाग उतरविण्याचे काम करते.

Web Title:  Panchayat hazardous castles, buildings always endangered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.