वट असूनही शिक्षणात माठ असणाऱ्यांची पंचाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 08:29 PM2020-12-25T20:29:54+5:302020-12-26T00:39:22+5:30
लासलगाव : नुकत्याच एका शासन निर्णयाने अंगठेबाज सरपंच व त्यातही महिला सरपंचपदावर आरक्षणाने विराजमान झालेल्या सरपंचपदामुळे अनेक घोटाळे उघडकीस आले. त्याची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता आता सरपंच व्हायचे असेल तर सातवी पास ही शैक्षणिक अर्हता अनिवार्य करण्यात आल्याने अनेकांना इच्छा असूनही निवडणुका लढविता येणार नाही. त्यामुळे त्यांचा मोठा हिरमोड झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शासनाने नवा जीआर जारी केल्याने ग्रामपंचायत सदस्य होण्याच्या अनेकांच्या इच्छांवर पाणी फेरले आहे. जो उमेदवार १९९५ नंतर जन्मलेला असेल आणि ज्याला सरपंच म्हणून नियुक्त करायचे असेल तर संबंधित उमेदवार सातवी पास असणे आवश्यक आहे. २४ डिसेंबरला हा जीआर जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गावात वट असूनही केवळ शिक्षण नसल्याने अनेकांना निवडणूक लढवता येणार नाही. परिणामी आपल्या सग्यासोयऱ्यांना, शिकलेल्या बायकोला उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी सेटिंग सुरू केली आहे.
सलग सुट्ट्यांमुळे टेन्शन
निवडणूक आयोगाने इच्छुकांना २३ ते ३० डिसेंबरदरम्यान अर्ज भरण्यास सांगितले आहे. मात्र, यातील तीन दिवस तर सुट्ट्यांमध्येच जात असल्याने कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे आता इच्छुकांची थेट सोमवारीच अर्ज भरण्यासाठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, झेरॉक्स करणे, अनामत रकमेची जमावजमव करणे आदी गोष्टींसाठी या इच्छुकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ऑनलाइन अर्ज भरतानादेखील अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत. तांत्रिक कारणामुळे उमेदवारी अर्ज भरताना वेळ लागत आहे.
सेतू केंद्रांवर गर्दी
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तालुक्यातील सेतू केंद्रावर प्रचंड गर्दी झाली आहे. उमेदवार आणि त्यांचे समर्थक एकाच वेळी सेतू केंद्रावर आल्याने ही गर्दी झाली असून त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच ग्रामपंचायत क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात हे चित्र पाहायला मिळत आहे.