पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची पंचवटीत कारवाई
By admin | Published: November 4, 2014 12:22 AM2014-11-04T00:22:05+5:302014-11-04T00:23:53+5:30
पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची पंचवटीत कारवाई
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला सध्या खडबडून जाग आली असून, त्यांच्याकडून शहरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविली जात आहे. पंचवटी परिसरातील सिद्धलक्ष्मी अपार्टमेंटचा परिसर, गोरक्षनगर, दिंडोरीरोड परिसरातील काही अतिक्रमणे हटविण्यात आली.
यामध्ये विनापरवाना अनधिकृतरीत्या थाटण्यात आलेले पत्र्यांचे शेड, पक्के बांधकाम तोडण्यात आले. सदर मोहीम आयुक्त सोनाली पोंक्षे यांच्या आदेशान्वये उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. महापालिकेच्या वतीने बेकायदेशीर बांधकामांवर जेसीबीचा पंजा फिरविला जात असून, पार्किंगच्या जागेत किंवा घरासमोरील रस्त्यात वाढविलेले रॅम्प, शेड काढून घ्यावेत असे वेळोवेळी सूचित करूनदेखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. ज्या नागरिकांची अतिक्रमणे असल्याचे निदर्शनास आल्यास ती अतिक्रमणे तातडीने उद्ध्वस्त करण्यात येतील व संबंधितांकडून दंड वसूल केला जाणार असल्याचे बहिरम यांनी सांगितले. महापालिके च्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पंचवटी, नाशिकरोड प्रभागाप्रमाणेच पूर्व प्रभागातील नागजी रुग्णालय, वडाळा-पाथर्डी रोड परिसर, वडाळागाव गावठाण कॉलनी परिसर, इंदिरानगर, डीजीपीनगर आदि भागांत तातडीने मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)