जैवविविधतेची पंढरी अंजनेरीला हवे संरक्षण
By अझहर शेख | Updated: May 22, 2021 01:24 IST2021-05-22T01:24:14+5:302021-05-22T01:24:41+5:30
निसर्गातील जे घटक नामशेष होत चाललेत, अशा वनस्पती असोत किंवा वन्यजीव, त्यांचे अंजनेरी राखीव वनाच्या कुशीत संवर्धन होताना दिसून येते. लांब चोचीचे व पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचे माहेरघर म्हणून ‘’अंजनेरी’’चा नावलौकिक तर आहेच, मात्र दुर्मिळ ‘’सेरोपेजिया अंजनेरिका’’ (कंदिलपुष्प)सारख्या असंख्य वनस्पती या राखीव वनक्षेत्रात आढळतात. समृद्ध जैवविविधतेचा हा नैसर्गिक वारसा अखंडितपणे संरक्षित ठेवणे काळाची गरज बनली आहे.

जैवविविधतेची पंढरी अंजनेरीला हवे संरक्षण
नाशिक : निसर्गातील जे घटक नामशेष होत चाललेत, अशा वनस्पती असोत किंवा वन्यजीव, त्यांचे अंजनेरी राखीव वनाच्या कुशीत संवर्धन होताना दिसून येते. लांब चोचीचे व पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचे माहेरघर म्हणून ‘’अंजनेरी’’चा नावलौकिक तर आहेच, मात्र दुर्मिळ ‘’सेरोपेजिया अंजनेरिका’’ (कंदिलपुष्प)सारख्या असंख्य वनस्पती या राखीव वनक्षेत्रात आढळतात. समृद्ध जैवविविधतेचा हा नैसर्गिक वारसा अखंडितपणे संरक्षित ठेवणे काळाची गरज बनली आहे.
शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजनेरीचे नैसर्गिक आणि पर्यावरणीयदृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. या राखीव वनाच्या परिसरात अलीकडच्या काळात मानवी हस्तक्षेप वाढताना दिसून येतोय. आजुबाजूला विविध प्रकल्प उभे राहत आहेत. मानवाचे अतिक्रमण हळूहळू या वनाच्या दिशेने होऊ लागले असून यास वेळीच रोखण्याची गरज आहे. शासनाने या वनक्षेत्राला राखीव वनाचा दर्जा दिला आहे. तसेच वन विभागाने औषधी वनस्पती संवर्धन क्षेत्र म्हणून या भागाला घोषित केले आहे. अंजनेरी राखीव वनात असलेली कारवीची वाढ ही दर्जेदार झाली असून कारवीची फुले यावर्षी फुलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अशी आहे वन्यजीवसंपदा...
अंजनेरी वनात बिबटे, कोल्हे, मोर, तरस, खोकड, माकड, रानडुक्कर, साळींदर, मुंगुस, रानमांजर, उदमांजर, रानससे, लांडगा, भेकर, घोरपड, लांब चोचीचे गिधाड, पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचा अधिवास आढळून येतो. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये भारतीय अजगर, हरणटोळ, घोणस, कोब्रा (नाग), मण्यार आदी सर्प आढळतात. याबरोबरच विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी हे वन नंदनवन आहे.
२००६ साली ‘’कंदीलपु�प’’चा शोध
अंजनेरीच्या पठारावर तेराशे मीटर उंचीवर मुरमाड जागेमध्ये सेरोपेजिया या वनस्पतीची नोंद शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. आर. यादव व डॉ. नीलेश मालपुरे यांनी २००६ मध्ये केली. ती सर्वात प्रथम अंजनेरीवर सापडली, म्हणून तिला ‘’सेरोपेजिया अंजनेरिका ‘’(कंदीलपु�प) असे नाव दिले गेले.
‘वाघाटी’ केवळ अंजनेरी वनात
२०२० साली नाशिकमधील अभ्यासक डॉ. संजय औटी, शरद कांबळे, कुमार विनोद, अरुण चांदोरे यांनी अंजनेरीचा भौगोलिक अभ्यास करून तेथील जैवविविधतेवर प्रकाश टाकणारा शोधनिबंध तयार केला आहे. त्यांना दुर्मिळ ‘’वाघाटी’’ ही वनस्पती आढळून आली आहे. ही वनस्पती अन्यत्र कोठेही नसल्याचा दावा औटी यांनी केला आहे.