पंढरीच्या वारीत भेटतो परमपुरुषार्थ प्राप्तीचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:43 AM2018-07-23T00:43:18+5:302018-07-23T00:43:35+5:30
आषाढाची चाहूल लागली की वारकऱ्याची अवस्था ‘संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टकळा पंढरीचा॥’ अशी होते. थोतांड, कर्मकांड आणि भाकड गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण जोपासणारा वारकरी ‘पंढरीची वारी आहे माझे घरी।आणिक न करी तिर्थव्रत॥’ असे सात्विक अभिमानाने सांगत वारीला निघतो.
आषाढाची चाहूल लागली की वारकऱ्याची अवस्था ‘संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टकळा पंढरीचा॥’ अशी होते. थोतांड, कर्मकांड आणि भाकड गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण जोपासणारा वारकरी ‘पंढरीची वारी आहे माझे घरी।आणिक न करी तिर्थव्रत॥’ असे सात्विक अभिमानाने सांगत वारीला निघतो. नाशिक जिल्हा तर अशा खानदानी वारकºयांचे आगारच म्हणावे लागेल. पिढ्यानपिढ्या ‘पंढरीचा वारकरी। वारी चुको नेदी हरी॥’असं म्हणत नाशिककर वारकरी वारी करीत आहे. यामुळेच अध्यात्माची राजधानी असा लौकक असणाºया नाशिकचा वारीतही झेंडा पुढेच असतो.
‘सकळांशी येथे आहे अधिकार । कलियुगी उध्दार हरिच्या नामे॥’ अशी साधी,सोपी आणि सरळ भक्तीची शिकवण देणाºया वारकºयांना वारी म्हणजे आयुष्याचे सार्थक करणारा सोहळा आणि साधना. एºहवी वारकरी लौकीक गोष्टीला कधीही महत्व देत नाही. ‘तुका म्हणे नको वरपंग देवा।घ्यावी माझी सेवा भाव शुध्द॥’ असा दंडक असणाºया वारकºयाला अंतकरणपूर्वक विठ्ठलाची भक्त करणेच आवडते. ‘आषाढी कार्तिक पंढरीची वारी। साधन निर्धारी आण नाही॥’ असा वारकºयाचा ठाम निर्धार आहे. पंढरपूरची वारी म्हणजे वारकºयाचं सर्वस्वच. वारी म्हणजे साधना.वारकरी वारीला मोक्षाचा मार्ग समजतात. ‘पंढरीचे वारकरी। ते अधिकारी मोक्षाचे॥’असा सुप्रसिध्द आणि प्रमाण मानला जाणारा अभंग आहे. याचाच अर्थ वारी म्हणजेच मोक्ष.मानवी जीवनात परमपुरुषार्थ प्राप्त करावा अशी सर्वांचीच इच्छा असते.तो वारकºयाला वारीत दिसतो,भेटतो आणि याची देही याची डोळा अनुभवण्यास मिळतो. पंढरपूरच्या वारीतला आनंद तर संतांच्या भाषेत ‘हा सुखसोहळा स्वर्गी नाही’ अशाच स्वरुपाचा असतो. कोणाला निमंत्रण नाही, कोणाला आग्रह नाही, कोणाचा बडेजाव नाही. तरीही वर्षानुवर्षे हा सोहळा वर्धिष्णू स्वरुपात सुरुच आहे. ‘गात जागा,गात जागा।प्रेम मागा विठ्ठला॥’ अशी भजनावली म्हणत वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. वारकºयांच्या भजनात सात्विकता तर असतेच शिवाय प्रबोधनही असते. वारकºयांची वाद्य, भजनाच्या चाली, पावल्या या सर्व सुसंस्कृतपणे कलाविष्कार करणाºया असतात.ताल आणि तोल या दोन्हीतही वारकरी पक्का असतो. निष्काम भक्तीचे प्रतिक म्हणजे वारकरी. तो कुणाकडेही काहीही मागत नाही. जे मागतो ते हेच ‘हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा॥’ हीच वारक-याची खरी ओळख. -अॅड. भाऊसाहेब गंभीरे
(लेखक कीर्तनकार व संत साहित्याचे अभ्यासक )