पंडितनगर भाजीमार्केट ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:22 AM2019-11-23T00:22:13+5:302019-11-23T00:24:03+5:30
सिडको प्रशासनाच्या वतीने रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना पंडितनगर येथे हक्काची जागा उपलब्ध करून दिली असली तरी येथील अर्धवट कामांमुळे अद्यापही बाजार थाटला जात नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
सिडको : सिडको प्रशासनाच्या वतीने रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना पंडितनगर येथे हक्काची जागा उपलब्ध करून दिली असली तरी येथील अर्धवट कामांमुळे अद्यापही बाजार थाटला जात नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. बाजाराच्या आतील रस्ते झालेले नसून पथदीपही बंद आहे. याबरोबच वाढलेल्या गाजरगवतामुळे परिसराला बकालस्वरूप प्राप्त झाले आहे. महापालिकेने येथे मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे.
सिडको पंडितनगर येथील संत गाडगे महाराज भाजी मार्केट व शॉपिंग सेंटरची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, भाजीमार्केट गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असून, याठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला आहे. महापालिकेच्या वतीने सिडको भागात भाजीपाला व फळविक्रेत्यांसाठी हॉकर्स झोन बनविले असले तरी अजूनही अनेक भागांतील मुख्य चौक तसेच रस्त्यांवर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. पंडितनगर येथे भाजीपाला विक्रेत्यांसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी याठिकाणी मनपाच्या वतीने मूलभूत सुविधा दिल्या जात नसल्याने भाजीपाला विक्रेते व्यवसाय करीत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
पथदीपची व्यवस्था करावी
पंडितनगर येथे सिडको प्रशासनाच्या वतीने दोनशेहून अधिक विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिली असली तरी केवळ मनपाने याठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याने भाजी मार्केट ओस पडले आहे. मनपाने या ठिकाणचे अंतर्गत रस्ते तयार करून द्यावे पथदीपांची व्यवस्था करून द्यावी तसेच वाढलेले गाजरगवत हटवावे यांसह मार्केटमध्ये मूलभूत सुविधा देण्याची अपेक्षा भाजीपाला विक्रेत्यांनी केली आहे.
रस्त्यावर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाºया विक्रेत्यांना पंडितनगर येथे हक्काची जागा मिळाली आहे. परंतु मनपाच्या वतीने याठिकाणी मूलभूत सुविधा पुरविल्या नसल्याने भाजीमार्केट ओस पडले आहे. गेल्या दहा वर्षांपासून हा प्रश्न सुटलेला नूसन यामुळे विक्रेत्यांना हक्काची जागा मिळूनही व्यवसाय करता येत नाही. मनपाने याठिकाणी मूलभूत सुविधा दिल्यास भाजीबाजार सुरू होण्यास मदत होईल.
- विठ्ठल विभुते,
अध्यक्ष, संत गाडगे महाराज भाजीमार्केट