पॅनल निर्मितीच्या हालचाली
By admin | Published: October 17, 2016 01:10 AM2016-10-17T01:10:40+5:302016-10-17T01:12:10+5:30
भाजपात सामसूम : सटाण्यात कॉँग्रेसचा उमेदवार जाहीर
सटाणा : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढविण्याबाबत राष्ट्रीय कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचा अद्याप निर्णय झाला नसताना कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी सटाणा पालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय पंडितराव पाटील यांचे नाव जाहीर केल्याने अनेक राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, पाटील यांची उमेदवारी जाहीर करून कॉँँग्रेसने आघाडी घेतली असून, पॅनल निर्मितीसाठी हालचालींना वेग आला आहे.
नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सटाणा शहरात नुकतीच कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व इच्छुकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठेंगोडा, पठावे दिगर, नामपूर गट वगळता इच्छुकांचा अभाव दिसून आला.
ठेंगोडा गटात जिल्हापरिषदेच्या माजी सभापती संगीता पाटील, प्रा. अनिल पाटील यांच्या सौभाग्यवती सारिका, गणात पंचायत समिती सदस्य परशुराम अहिरे यांच्या सौभाग्यवती, मुंजवाड गणातून संजय गरुड, पठावे दिगर गटातून सुरेश वाघ, राजाराम गांगुर्डे, सचिन कोठावदे, नामपूर गटातून सोमनाथ सोनवणे यांनी दावेदारी केली, तर नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्ष पानगव्हाणे यांनी थेट विजय पाटील यांचे नाव जाहीर करून उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, संपर्क प्रमुख राधाकृष्ण विखेपाटील, उत्तर महाराष्ट्रचे प्रभारी आमदार भाई जगताप ,पक्षनिरीक्षक डी.जी.पाटील यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
बैठकीत जिल्हाध्यक्ष पानगव्हाणे यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला असला तरी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या वरिष्ठ पातळीवर निवडणुका एकत्रित लढण्याची चर्चा आहे. मात्र अद्याप निर्णय झाला नसताना पानगव्हाणे यांनी पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजय पाटील यांचे धाकटे बंधू व जिल्हापरिषदेचे माजी सभापती यशवंत पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, शहराध्यक्ष किशोर कदम, जिल्हापरिषद सदस्य प्रा. अनिल पाटील, प्रल्हाद पाटील, अण्णा काशीराम सोनवणे, यशवंत अहिरे, सोमनाथ सूर्यवंशी, पांडुरंग भामरे, सचिन कोठावदे परशुराम अहिरे, सिराज मुल्ला आदि उपस्थित होते. (वार्ताहर)