पांगरी : दूध दरवाढ व पूर्व भागात पाण्याचे टॅँकर सुरू करण्याची मागणी छावा संघटनेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:11 AM2018-05-11T00:11:29+5:302018-05-11T00:11:29+5:30
पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, टॅँकर सुरू करण्यासह दूध दरवाढ करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, टॅँकर सुरू करण्यासह दूध दरवाढ करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे पाऊण तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहनांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. टॅँकरचे प्रस्ताव आल्यानंतर त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल व दूध दरवाढीबाबत वरिष्ठांकडे भावना पोहचविल्या जातील, असे आश्वासन तहसीलदार नितीन गवळी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही या आंदोलनास पाठिंबा दिला होता. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर छावा संघटनेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शेतकरी व महिला रस्त्यावर ठाण मांडून बसल्या होत्या. हंडे घेऊन महिला रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. दूध दरवाढ झालीच पाहिजे आणि पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनानंतर तहसीलदार नितीन गवळी पांगरी येथे दाखल झाले त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे आनंद रासणे, मंडळ अधिकारी व्ही. व्ही. गोसावी, ग्रामविकास अधिकारी पी. आर. बोरसे आदी उपस्थित होते. यावेळी भाऊसाहेब बैरागी, रामजी पगार, संपत पगार स्वाभिमानी संघटनेचे आत्माराम पगार, शांताराम पगार, संजय वारूळे, बारकू पगार, आर, टी, जाधव, छावा संघटनेचे राशिद सय्यद, अखिलेश राजपूत, अरुण निकम, प्रकाश पांगारकर, निखिल पांगारकर, रमेश पांगारकर, सुनील कलकत्ते, समाधान पांगारकर, लताबाई पगार, सुलोचना निकम यांच्यासह ग्रामस्थ, महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसंत पगार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सरकार शेतकऱ्याविरुद्ध असून, आतापर्यंत शेतकºयांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नसल्याचा आरोप केला. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला असल्याचे ते म्हणाले. दूध खरेदी व दूध पिशवी विक्रीमध्ये असणारी तफावत दूर करत स्वामीनाथन आयोग लागू करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर सुभाष पगार, शत्रुघ्न झोंबड, सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर यांनी मनोगत व्यक्त केले.