बर्ड फ्लूच्या भीतीने मका उत्पादकात घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:16 AM2021-01-25T04:16:07+5:302021-01-25T04:16:07+5:30
गेल्या काही वर्षांपासून सतत पडणारा दुष्काळ व त्यात यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या टाळेबंदीच्या संकटामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना ...
गेल्या काही वर्षांपासून सतत पडणारा दुष्काळ व त्यात यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या टाळेबंदीच्या संकटामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा निसर्ग वादळ तसेच वेळोवेळी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. कांद्याचे बाजारभाव निश्चित नसल्याकारणाने यंदा नगदी पीक म्हणून मालेगाव तालुक्यातील शेतकरी मका पिकाकडे वळला होता. इतर पिकांच्या तुलनेत खरीपात मक्याचे पीक गेल्या काही वर्षांपासून चांगले येत असल्याने व उत्पादनाची हमखास खात्री निर्माण झाल्याने अनेक शेतकरी नगदी पीक म्हणून मका लागवडीस पसंती देतात. मात्र मक्यावर पडणाऱ्या लष्करी अळीच्या आक्रमणाने शेतकऱ्यांना महागड्या जंतूनाशक औषधांची फवारणी करावी लागत असल्याने मका पिकासाठी एकरी १५ ते २० हजार रुपये खर्च करावा लागतो. त्यात शेतमजूर मिळात नसल्याने घरच्या मंडळींना राबावे लागते. चार महिने मेहनत घेऊन मक्याचे एकरी उत्पादनातून साधारणतः १५ ते २० क्विंटल येते. त्यात मक्याला पुरेसा बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरात फारसे काहीच पडत नाही.
मक्यास महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यातील कंपन्यांतर्फे मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे मलेशिया व तैवान या देशांना मका निर्यात केला जात असतो. स्टार्च कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर मका लागत असतो. यामुळे वर्षभर मक्याची मागणी असते. मात्र काही राज्यांमध्ये आलेल्या बर्ड फ्लूच्या भीतीमुळे पोल्ट्री व्यवसायासाठी लागणाऱ्या मक्याच्या मागणीत अचानक घट झाली आहे. मका पिकासाठी शासनाने १८ हजार ५०० रुपये आधारभूत किंमत निश्चित केलेली असताना, खासगी व्यापारी मात्र ११०० ते १३०० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मक्याची खरेदी करीत आहेत. त्यामुळे मका उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला दिसून येत आहे.
कोट...
पोल्ट्री व्यावसायिकांप्रमाणे शासनाने मका उत्पादक शेतकऱ्यांची वेळीच दखल घेऊन, मका पिकास निश्चित केलेल्या आधारभूत किमतीच्या तुलनेत कमी किमतीत विक्री झालेल्या मक्यास प्रति क्विंटल किमान ५०० रुपये नुकसानभरपाई म्हणून अनुदान द्यावे. अन्यथा शेतकरी पुढील वर्षी मका पिकावर बहिष्कार टाकतील.
- अतुल दुकळे, मका उत्पादक, जळगाव निंबायती