दोडी शिवारात बछड्यासह बिबट्या मादीची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 01:04 AM2022-03-26T01:04:12+5:302022-03-26T01:04:32+5:30
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक शिवारातील दत्तवाडी वस्तीवर गेल्या काही दिवसांपासून बछड्यासह मादीने दहशत निर्माण केली आहे. पाळीव प्राण्यावर बिबट्याचे हल्ले वाढले असून एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक शिवारातील दत्तवाडी वस्तीवर गेल्या काही दिवसांपासून बछड्यासह मादीने दहशत निर्माण केली आहे. पाळीव प्राण्यावर बिबट्याचे हल्ले वाढले असून एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे दोडी शिवारात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे.
दोडी येथील बाळासाहेब शंकर आव्हाड यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्याने आरडाओरड करण्याबरोबरच पळ काढल्याने ते बचावले. पिकांना पाणी देण्यासाठी ते सकाळी सहा वाजता विहिरीवर गेले होते. जवळच झुडपात बसून असलेल्या बछड्यासह बिबट्याने डरकाळी फोडली. आव्हाड यांना काही सुचेनासे झाले. मात्र, मोठमोठ्याने आरडाओरडा करून पळ काढण्यास त्यांनी सुरुवात केली. या परिसरात दिवसा बिबट्याचा वावर वाढल्याने दत्तवाडी परिसरातील शेतकरी शेतकामांसाठी शेतावर जाण्यास घाबरत आहेत. सुमारे आठवड्यापासून बिबट्याने मक्याच्या शेतात मुक्काम ठोकला आहे. दत्तवाडी, सांगळे वस्तीवरील शेळ्या, कुत्रे फस्त करण्याचा सपाटा लावला आहे. पाळीव प्राण्यांचे बळी जात असल्याने आर्थिक नुकसानही सोसावे लागत आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अशोक आव्हाड यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.