दुचाकीस्वारांची दहशत : तीन दिवसांत ५८ हजारांची लूट
By admin | Published: March 25, 2017 09:50 PM2017-03-25T21:50:29+5:302017-03-25T21:50:29+5:30
मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत आता जबरी चोरीचे अर्थात लुटीचे सत्र सुरू झाले आहे़ या ठिकाणी गत तीन दिवसांत जबरी चोरीच्या तीन घटना घडल्या
नाशिक : पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यामुळे निलंबित करण्यात आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलीस आयुक्तांना अवैध धंद्याबाबत नियमित दिली जाणारी निवेदने अशा एक ना अनेक कारणामुळे चर्चेत असलेल्या मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत आता जबरी चोरीचे अर्थात लुटीचे सत्र सुरू झाले आहे़ या ठिकाणी गत तीन दिवसांत जबरी चोरीच्या तीन घटना घडल्या असून, येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी व बीट मार्शलच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे़
सिडकोच्या त्रिमूर्ती चौकातील पाटीलनगरमधील संध्या श्यामराव देशमुख (४०) या बुधवारी (दि़२२) दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास गोविंदनगर परिसरातील सात्विक अपार्टमेंटजवळून पायी जात होत्या़ त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे दोन तोळे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले़ या प्रकरणी देशमुख यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़