‘पांजरापोळ’ने वीज बिलाचे थकीत ५४ लाख भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 01:18 AM2019-08-29T01:18:34+5:302019-08-29T01:18:54+5:30

विजेचा वाणिज्य वापर करून साडेतीन लाख रुपये जादा वीज वापराचे भरण्यास नकार देणाऱ्या पांजरापोळ संस्थेने तब्बल २२ वर्षे वीज मंडळाच्या विरोधात न्यायालयीन लढा देऊनही पदरी अपयश पडले असून, जिल्हा न्यायालयात यासंदर्भात सुरू असलेल्या दाव्याचा नुकताच निकाल लागून पांजरापोळ संस्थेने ५४ लाख रुपये भरावे, असे आदेश दिले आहेत.

'Panjrapole' pays Rs 2 lakh on electricity bill | ‘पांजरापोळ’ने वीज बिलाचे थकीत ५४ लाख भरले

‘पांजरापोळ’ने वीज बिलाचे थकीत ५४ लाख भरले

Next

नाशिक : विजेचा वाणिज्य वापर करून साडेतीन लाख रुपये जादा वीज वापराचे भरण्यास नकार देणाऱ्या पांजरापोळ संस्थेने तब्बल २२ वर्षे वीज मंडळाच्या विरोधात न्यायालयीन लढा देऊनही पदरी अपयश पडले असून, जिल्हा न्यायालयात यासंदर्भात सुरू असलेल्या दाव्याचा नुकताच निकाल लागून पांजरापोळ संस्थेने ५४ लाख रुपये भरावे, असे आदेश दिले आहेत.
पांजरापोळ संस्थेने १९७५ व ७७ साली वीज मंडळाच्या पंचवटी उपविभागाकडून ३ फेजच्या दोन वीज जोडण्या घेतल्या होत्या. त्यातील एक चिलिंग प्लॅन्टसाठी व एक शेतीपंपासाठी होती. या दोन्ही जोडण्यासाठी घरगुती वापराचे वीज देयक अदा केले जात असताना वीज मंडळाच्या भरारी पथकाने १९८६ मध्ये अचानक पांजरापोळच्या वीज वापराची तपासणी केली असता, पांजरापोळ संस्थेकडून विजेचा वापर वाणिज्यसाठी केला जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे वीज मंडळाने वीज वापराबाबत पांजरापोळ संस्थेला साडेतीन लाख रुपयांचे फरकाचे बिल दिले होते. पांजरापोळ संस्थेने वीज मंडळाच्या या वाढीव बिलाला विरोध दर्शवून थेट न्यायालयात धाव घेतली होती. पांजरापोळ संस्थेत बसविण्यात आलेले वीज मीटर नादुरुस्त असल्याने वीज मंडळाने पांजरापोळचा वीजपुरवठा खंडित करू नये, असा दावा १९९७ मध्ये दाखल केला होता. या दाव्याचा निकाल २००५ मध्ये लागला. त्यात वीज मंडळाची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला.
कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात पांजरापोळने थेट उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविण्यासाठी अपील दाखल केले. परंतु उच्च न्यायालयाने न्यायकक्षाच्या मुद्द्यांच्या आधारे सदरचे अपील जिल्हा न्यायालयाकडे वर्ग केल्यानंतर त्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश आर. एम. जोशी यांच्यासमोर झाली. त्यात वीज मंडळाकडून अ‍ॅड. मनोजकुमार हगवणे पाटील यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला असता न्यायालयाने सन २००५ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला.
दंडाची रक्कम व्याजासह वसूल
तब्बल २२ वर्षांपासून खटला न्यायालयात सुरू असल्यामुळे पांजरापोळ संस्थेकडे थकीत असलेली साडेतीन लाख रुपयांची रक्कम दंड, व्याजासह ५४ लाखांपर्यंत पोहोचली. जिल्हा न्यायालयाचा निकाल वीज मंडळाच्या बाजूने लागल्यानंतर तत्काळ वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रवीण दलोरी यांनी पांजरापोळ संस्थेला नोटीस पाठवून थकीत ५४ लाख रुपये भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला. या नोटिसीनंतर संस्थेने तत्काळ ५४ लाख रुपयांचा भरणा केला.

Web Title: 'Panjrapole' pays Rs 2 lakh on electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.