स्त्री खंबीर झाली तरच स्त्रीभ्रूणहत्त्या थांबेल पंकजा मुंडे : ग्रामज्योती पुरस्काराचे वितरण
By admin | Published: February 9, 2015 01:01 AM2015-02-09T01:01:50+5:302015-02-09T01:02:19+5:30
स्त्री खंबीर झाली तरच स्त्रीभ्रूणहत्त्या थांबेल पंकजा मुंडे : ग्रामज्योती पुरस्काराचे वितरण
पंचवटी : स्त्रीभ्रूणहत्त्या ही समाजापुढील मोठी समस्या आहे. स्त्रीभ्रूणहत्त्या रोखण्यासाठी शासकीय पातळीवर उपाय योजना केल्या जात असल्यातरी खऱ्या अर्थाने स्त्री सक्षम झाली तरच समाजातील स्त्रीभ्रूणहत्त्या थांबवता येतील, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. मखमलाबाद येथे कै. नारायणराव मानकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ग्रामज्योती पुरस्कार सोहळ्याप्रसंगी मुंडे अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८३व्या जयंतीनिमित्ताने प्रभाग ६ मधील गुणवंत विद्यार्थिनी तसेच कष्टकरी महिलांना ग्रामज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना मुंडे पुढे म्हणाल्या की, स्त्री ही अगदी बालवयापासूनच खंबीर असते. चार वर्षांची मुलगी आपल्या लहान भावाला कडेवर घेते तर पाच वर्षांची मुलगी डोक्यावर पाण्याची घागर घेऊन मातेला मदत करते. अशाही समाजात अजूनही पुरुषप्रधान विचार असून, मुलगा झाला तर हुंडा मिळतो असा विचार करणाऱ्या प्रवृत्ती असल्याने स्त्री संस्कृतीचा आदर करणारी परंपरा लोप पावत आहे. समाज सुरक्षित राहण्यासाठी समाजप्रबोधन करणे गरजेचे आहे, असे सांगून जो माणूस विचार करतो तो संवेदनशील असतो, असेही मुंडे यांनी शेवटी सांगितले. यावेळी मुंडे यांच्या हस्ते क्रांतिज्योती पुरस्काराचे वितरण करण्यात आले.