पंकजातार्इंनी हेरली खरी अस्वस्थता !
By किरण अग्रवाल | Published: April 15, 2018 01:39 AM2018-04-15T01:39:07+5:302018-04-15T01:39:07+5:30
सत्तेपासून दूर राहावे लागत असलेल्यांचे मनोधैर्य खचणे समजून घेता येणारे असते. पण सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांबाबत तशी वेळ ओढवणे म्हणजे विशेषच. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिक भाजपाच्या मेळाव्यात बोलताना तोच धागा उलगडून दाखवला. पक्ष-कार्यकर्त्यांतील अस्वस्थता त्यांनी मांडली. दिल्ली ते मुंबई, सत्ताधारी असूनही भाजपाला आपल्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता दूर करता आली नसेल तर ते काय दर्शवते? मुंडे यांनी अचूकपणे हेरलेल्या या विषयाकडे त्यांच्या पक्षाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे ठरावे.
साराश
सत्तेपासून दूर राहावे लागत असलेल्यांचे मनोधैर्य खचणे समजून घेता येणारे असते. पण सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांबाबत तशी वेळ ओढवणे म्हणजे विशेषच. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिक भाजपाच्या मेळाव्यात बोलताना तोच धागा उलगडून दाखवला. पक्ष-कार्यकर्त्यांतील अस्वस्थता त्यांनी मांडली. दिल्ली ते मुंबई, सत्ताधारी असूनही भाजपाला आपल्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता दूर करता आली नसेल तर ते काय दर्शवते? मुंडे यांनी अचूकपणे हेरलेल्या या विषयाकडे त्यांच्या पक्षाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे ठरावे.
सत्तेला सेवेचे साधन मानण्याचा काळ गेला. आता सत्तेकडे समृद्धीचे साधन म्हणूनच पाहिले जाते. सत्ताबदल होताच नव्या सत्ताधाऱ्यांच्या पक्षात येणाºयांची रांग लागते ती त्यामुळेच. पण, सत्तेतून संधी साधण्यासाठी इतरेजन आसुसले असताना किंवा बाकीचेच लोक सत्तेचा लाभ अनुभवत असताना खुद्द सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांत मात्र अस्वस्थता आढळून येत असेल तर कुठे तरी चुकतेय हे मान्यच करायला हवे. राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी हीच अस्वस्थता बोलून दाखविण्याचे धारिष्ट्य करून पक्ष कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचविण्यासाठी प्रयत्नांची गरज प्रतिपादित केली आहे. त्यामुळेच मग ‘अच्छे दिन’ नेमके कुणाला आले, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरून गेले आहे. राज्यातील भाजपात खºयाअर्थाने जनाधार लाभलेले जे मोजके नेते होते व आहेत त्यात स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे नाव आवर्जून अग्रक्रमाने घेतले जाते. सत्तेत असताना असो वा नसताना, ते जेव्हा जेव्हा दौºयावर येत तेव्हा कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा त्यांच्या अवतीभोवती असे. प्रचंड लोकसंग्रह ही त्यांची खासियत होती. त्यांच्या पश्चात कन्या पंकजा मुंडे यांनी तोच वारसा जपलेला दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच्या त्यांच्या नाशिक दौºयातही त्याचा प्रत्यय येऊन गेला. जिल्हा परिषदेतर्फे आयोजित अस्मिता मेळावा हा त्यांच्या दौºयातील मुख्य कार्यक्रम होता. त्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका व आरोग्यसेविका आदींना सक्तीच केली गेलेली असल्यामुळे भरदुपारच्या रणरणत्या उन्हात महिलांची मोठी गर्दी झालेली दिसून आली आणि त्यामुळे व्यवस्थेचे नियोजन कोलमडले हा भाग वेगळा; परंतु मेळाव्यात स्वत: पंकजातार्इंनी व्यासपीठावरून गर्दीचे मोबाइलवरून शूटिंग करण्यापासून ते मेळाव्यानंतर त्यांच्याशी हस्तांदोलनासाठी उडालेली झुंबड व अन्यही कार्यक्रमांच्या ठिकाणी त्यांना भेटू पाहणाºयांची झालेली गर्दी, ही त्यांच्या लोकसंपर्काची साक्ष देणारीच होती. असे लोकांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये असणाºया नेत्यास संबंधितांच्या भावना चटकन कळतात, हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. पंकजा मुंडे यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलून दाखविलेल्या कार्यकर्त्यातील अस्वस्थतेच्या भावना या संपर्कातूनच लक्षात आल्या असणार. विशेष म्हणजे, मुंडे यांच्या एकच दिवस अगोदर राज्याचे महसूलमंत्री व भाजपातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील नाशकात येऊन गेले होते. शासकीय आढावा बैठकीनंतर पक्षाच्या ‘वसंत स्मृती’ कार्यालयात येण्याऐवजी त्यांनी विरोधी पक्षाच्या आमदाराकडे जाऊन गाठभेट घेतली होती. त्यातून नसत्या व निरर्थक चर्चा घडून आल्या आणि शिवाय भाजपातच संभ्रम व्यक्त होऊन शंका घेतली गेली. परंतु पंकजा मुंडे यांनी दिवस-भराच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून शेवटी पक्ष कार्यालयात हजेरी लावली व कार्यकर्त्यांच्या मनातील वेदना अचूकपणे मांडत त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे धीराचे दोन शब्द ऐकवले. भाजपाचा कार्यकर्ता सुसंस्कृत आहे. त्याने संयम बाळगून पक्षकार्य करत राहावे, असे आवाहनही मुंडे यांनी केले. पक्ष कार्यकर्ते शिस्तीचे व संयमी आहेत हे खरेच, मात्र किती दिवस त्यांनी संयम बाळगावा? सत्ता असूनही उन्नयनाची संधी मिळणार नसेल तर पुढील काळात पक्षासाठी कार्यकर्ते तरी कुठून वा कसे उपलब्ध होतील हा यातील खरा प्रश्न आहे. त्याच दृष्टीने कार्यकर्त्यांतील अस्वस्थतेचा जो मुद्दा पंकजा मुंडे यांनी मांडला तो महत्त्वाचा आहे. स्थानिक संदर्भाने बोलायचे तर, महापालिकेच्या साध्या स्वीकृत नगरसेवक-पदासाठी कार्यकर्त्याऐवजी नेते पुत्राला संधी दिली गेल्यावरही सुसंस्कृत कार्यकर्त्यांनी संयम राखलाच ना? पण पुढे काय? पंकजातार्इंनी व्यक्त केलेली स्वपक्षीय कार्य कर्त्यांची व्यथा-भावना याही-संदर्भाने महत्त्वाची आहे की, भाजपाचे नेते काँग्रेसमुक्त देश करायला निघाले आहेत. पण, भाजपाचेच कार्यकर्ते अस्वस्थ असतील तर कशी व कुणाच्या बळावर साधली जाईल ही मुक्ती? दुसरे म्हणजे, मनोधैर्य उंचवावे लागते ते पराभवाने खचलेल्यांचे, हा राजकारणातील सर्वसाधारण अनुभव आहे. पण, केंद्रात व राज्यात सत्ता असूनही भाजपाच्याच कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी एका मंत्र्याला थेट मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची गरज वाटत असेल तर सत्तेतून आलेली स्वकीयांबद्दलची बेहोशी किती गंभीर ठरली आहे हेच त्यातून स्पष्ट व्हावे. अलीकडेच मुंबईत पक्ष स्थापनादिनी मोठा महामेळावा झाला. त्यातून शक्तिप्रदर्शन घडविले गेले. त्याकरिता प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंबईत कार्यकर्ते आणण्याच्या खर्चाबाबत हात झटकत गर्दीचे ‘टार्गेट’ अनेकांना दिले होते. नेत्या-कार्यकर्त्यांनी तेही केले. परंतु पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली तरी, बहुसंख्य शासकीय महामंडळ व समित्यांवरील नियुक्त्यासुद्धा केल्या न गेल्याने पक्ष कार्यकर्ते आस लावून आहेत त्यांचे काय? संयम बाळगावा तो किती, असा प्रश्न त्यामुळेच निर्माण होणारा आहे. हा संयम तसा उपवासाशी साधर्म्य साधणारा असतो. म्हणूनच दोन दिवसांपूर्वी मोदी-शहा यांनी विरोधकांच्या निषेधार्थ देशभर उपोषणाचे फर्मान काढले तेव्हा नाशकातील मोजकेच पक्षनेते - कार्यकर्ते (ला)क्षणिक उपोषण करताना दिसून आले. व्यक्तिगत विकासाचे त्यांचे उपोषण कायम आहे, म्हणून ‘या’ उपोषणाला गंभीर प्रतिसाद लाभला नाही. तेव्हा पंकजा मुंडे यांनी भाजपा कार्यकर्त्यांतील अस्वस्थता हेरून ती पक्षाच्याच नेत्यांच्या पुढ्यात मांडली, ते बरेच झाले. स्थानिक नेत्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करावाच; पण मुंडे यांनीही खरेच त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून किमान पक्ष कार्यकर्त्यांना तरी ‘अच्छे दिन’ दाखवावेत, अशी अपेक्षा गैर ठरू नये.