पानसरे हत्त्या प्रकरण : मोबाइलवरील आवाजाचे नमुने गुजरातला पाठविले
By admin | Published: September 17, 2015 11:50 PM2015-09-17T23:50:40+5:302015-09-17T23:51:45+5:30
तिघे ताब्यात
कोल्हापूर : कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्त्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी संशयित समीर गायकवाड याच्या ‘ज्योती’ नावाच्या मुंबईतील प्रेयसी आणि संकेश्वर येथील दोन नातेवाइकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांच्या मोबाइल संभाषणाच्या आवाजाचे नमुने गुजरातला पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.
पानसरे हत्त्याप्रकरणी सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता समीर गायकवाड (३२) याला बुधवारी पहाटे कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले होते. त्यावरून ज्यांच्याशी त्याचे संभाषण झाले, त्यामध्ये एका तरुणीसह दोघा तरुणांचा समावेश होता. पोलिसांनी त्यांच्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने ते मुंबई, पणजी, संकेश्वर येथे राहत असल्याचे सांगितले.
सर्वांत जास्त मोबाइल कॉल्स ज्या तरुणीला झाले होते. तिच्याशी तुझे काय संबंध आहेत, अशी विचारणा केली असता ती आपली प्रेयसी असल्याची कबुली त्याने दिल्याचे समजते. त्यानुसार बुधवारी रात्री उशिरा त्याच्या मुंबईतील प्रेयसीसह जवळच्या दोन नातेवाइकांना ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी दिवसभर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. संशयित गायकवाड याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये बसवून ठेवले होते.
त्याच्याकडूनही पोलिसांचे विशेष पथक माहिती घेत होते; परंतु तो सुरुवातीपासून तपासाला सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
त्याच्यासह प्रेयसी व गायकवाडच्या दोन नातेवाइकांच्या आवाजाचे नमुने चाचणीसाठी गुजरातला पाठविण्यात आले.
--------------------
------
पुण्याच्या ‘सायबर सेल’चे पथक कोल्हापुरात
पुणे येथील ‘सायबर सेल’चे पथक गुरुवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. संशयित गायकवाड याच्याकडून २३ मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलवरून व ई-मेल आणि फेसबुकवरून त्याने आतापर्यंत कोणते संदेश (मेसेज) पोस्ट केले आहेत, त्याची माहिती हे पथक स्वतंत्रपणे तपास करून घेत आहे.
---------------------