कच्च्या मालाचे दर वधारल्याने कागदी बॅग उत्पादक संकटात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:43+5:302021-07-12T04:10:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय ठरणाऱ्या कागदी बॅगकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे. मात्र, मुळात कोरोनामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय ठरणाऱ्या कागदी बॅगकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे. मात्र, मुळात कोरोनामुळे सर्व व्यापार आणि व्यवसायांवरच संक्रांत आलेली असल्याने कागदी पिशव्यांची मागणीच अत्यल्प झाली आहे. त्यात या वैशिष्ट्यपूर्ण कागदी पिशव्यांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दरच ४० टक्क्यांनी वाढले असून, त्या प्रमाणात कागदी पिशव्यांच्या उत्पादनाचे दर वाढलेले नसल्याने कागदी बॅग उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत.
समाजातील बहुतेक सर्व व्यापारी क्षेत्र हळूहळू कागदी पिशव्या वापरू लागले आहे. त्यामुळेच जिल्ह्यात सुमारे ४५ ते ५० कागदी पिशव्या उत्पादक निर्माण झाले आहेत. कागदी पिशव्या घेणाऱ्या प्रत्येकाचा वापराचा हेतू भिन्न असतो. कागदी पिशव्या अगदी मेडिकलमध्ये गोळ्या पॅक करण्यासाठी वापरण्यापासून रेडिमेड गारमेंट, मॉल, ज्वेलर्स अशा सर्व व्यावसायिकांकडून वापरल्या जातात. त्यातही प्रामुख्याने किलोच्या हिशोबात घेतल्या जाणाऱ्या कागदी बॅगसह खाद्यपदार्थांसाठी कागदी बॅग, वैद्यकीय वापरासाठी कागदी बॅग, दागिन्यांच्या पॅकेजिंगसाठी कागदी बॅग, रेडिमेड गारमेंट, कापड दुकानांसाठीच्या कागदी बॅग, उद्योगांसाठी कागदी बॅग, पार्टी बॅग अशा अनेक बाबींचा समावेश आहे. कागदी बॅगच्या उत्पादनासाठी उत्पादकांना सर्वात पहिली पायरी म्हणजे ऑर्डरनुसार उत्पादनाचे आकार निश्चित करणे, कटिंग मशीनचा वापर करून इच्छित आकार अचूकपणे कागदांचे गठ्ठे कट करणे, त्यानंतर कागद फोल्डिंग, पेस्टिंग त्यानंतर आयलेट फिटिंग आणि लेस फिटिंग अशा पायऱ्या असतात. त्यातही जर संबंधिताला त्याचे नाव प्रिंटिंग करून आवश्यक असेल तर कागदी बॅगच्या उत्पादनानंतर त्यावर प्रिंटिंग करण्याची प्रक्रिया केली जाते.
इन्फो
स्टाइल स्टेटमेंटचा भाग
मी पर्यावरणाबाबत जागरूक आहे, पर्यावरणप्रेमी आहे, पर्यावरणाचे नुकसान होऊ नये याची काळजी घेणारा किंवा घेणारी आहे. अशी प्रतिमा जनमानसात ठसविण्यासाठी उच्चभ्रू वर्गात कागदी पिशव्या आता स्टाइल स्टेटमेंटचा भाग बनल्या आहेत. त्यामुळे मोठे मॉल्स, ज्वेलरी दालने, रेडिमेड गारमेंट्समधून कागदी पिशव्यांतूनच वस्तू ग्राहकाला सोपविल्या जाऊ लागल्याने कागदी पिशव्यांची मागणी वाढली आहे. मात्र, संबंधित सर्वच उद्योग अडचणीतून जात असल्याने त्याचा परिणाम कागद उत्पादकांवरही साहजिकपणे पडला आहे.
इन्फो
एका मशीनवर साधारणपणे १ टनचे उत्पादन करता येते. तेवढे उत्पादन घेतले तर उत्पादकाला फक्त दहा हजार रुपये मिळू शकतात. तसेच एका मशीनवर दिवसाला १०० किलो या प्रमाणे महिन्याला फार तर ३ टन उत्पादन घेता येते. म्हणजे फार तर ३० हजार रुपयेच उत्पादकांना मिळतात. त्यासाठीची गुंतवणूक, मनुष्यबळ, वीजखर्च या सर्व बाबींचा विचार करता हे प्रमाण व्यवसायाच्या दृष्टीने व्यस्त ठरत असल्याचे कागद बॅग उत्पादकांचे मत आहे.
कोट
जो कागदाचा कच्चा माल आम्हाला यापूर्वी भिवंडीहून ४० रुपये किलोने मिळायचा, तोच कच्चा माल आता ५५ रुपये किलो झाला आहे. या वाढीव दराच्या तुलनेत आम्हाला मॉल किंवा दुकानदारांकडून दर वाढवून मिळालेले नाहीत. त्यात सध्याच्या परिस्थितीत कागदी बॅगची मागणी कमी झालेली असल्याने एकूणच सर्वच कागदी बॅग उत्पादकांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.
पूजा दातीर, कागदी बॅग उत्पादक
------------
कागदी बॅग दिन विशेष
-----------
फोटो
येणार आहे.