पाडळी विद्यालयात कागदी पिशव्या बनविण्याची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 05:58 PM2020-03-08T17:58:57+5:302020-03-08T17:59:28+5:30
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कागदापासून पिशव्या बनवत प्लॅस्टीक वापरु नका असा संदेश दिला व यापुढे कुणीही प्लॅस्टीक वापरणार नाही अशी शपथ घेत शाळा प्लॅस्टीकमुक्त केली.
विद्यार्थ्यांनी वापरात न आणलेल्या कागदाचा पुर्नवापर करून त्यापासून कागदी पिशव्या बनविल्या. या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना प्लॅस्टीक वापराचे घातक परिणाम सांगितले. प्लास्टिक कचरा जमिनीत गाडला जाऊन तो न कुजता तसाच राहतो. जनावरांनी खाल्यास त्याचे पचन न होता जनावरास दुर्धर आजार होतात म्हणून या प्लास्टिकचा समूळ नायनाट करणे ही काळाची गरज आहे. मात्र, त्याचवेळी मानवी गरजा भागविण्यासाठी आपल्या दैनंदिन वापरातील टाकाऊ वस्तूपासून वेगवेगळ्या वस्तू निर्माण करणे गरजेचे आहे. यातील एक गरज म्हणून विद्यार्थ्यांनी कागदापासून पिशव्या तयार करून त्यांचे वाटप केले. प्लास्टिक स्वत: वापरू नका व इतरांनाही वापरू देऊ नका असा संदेश या विद्यार्थ्यांनी दिला. सविता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. उन्हाळयाची दाहकता लक्षात घेऊन परिसरातील पक्षांसाठी प्लॅस्टीक मुक्त पिण्याचे भांडे तयार करण्याचा निर्णयही यावेळी विद्यार्थ्यांनी घेतला.