अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणासह पाडस ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:21 AM2019-03-13T01:21:43+5:302019-03-13T01:22:44+5:30
नांदगाव तालुक्यातील साकोरा रस्त्यावरील शिवमळा वस्तीत मंगळवारी दुपारी अज्ञात वाहनाच्या धडकेने पाण्याच्या शोधात असलेल्या एक गरोदर हरणाचा पाडसासह मृत्यू झाला.
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा रस्त्यावरील शिवमळा वस्तीत मंगळवारी दुपारी अज्ञात वाहनाच्या धडकेने पाण्याच्या शोधात असलेल्या एक गरोदर हरणाचा पाडसासह मृत्यू झाला.
अपघातात अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने मादी हरणाचा तसेच जन्माला येण्याच्या अगोदरच पिलाचा मृत्यू झाल्याचे पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. गतवर्षी या भागात पाऊस न पडल्याने नागरिकांसह वन्यप्राण्यांनादेखील या दुष्काळाची चांगलीच झळ पोहोचत आहे. पाऊसच न पडल्याने शिवारातील सर्व नदी-नाले तसेच बंधारे कोरडे आहेत.
साकोरा रस्त्यावर असलेला मोरखडी बंधारा यावर्षी कोरडाच आहे. त्यामुळे परिसरातील वन्यजीव पाण्यासाठी नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. नेहमीप्रमाणे एक गरोदर हरीण नांदगाव-साकोरा रस्त्यावर पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडत असताना अचानक अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यात पोट कापले जाऊन अतिरिक्त प्रमाणात रक्तस्राव झाला. काही क्षणभर नवजात पाडस बाहेर आले. कुत्रे त्याला ओढून नेण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी पाडसाची सुटका केली, मात्र काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला. हे सर्व दृश्य पाहून उपस्थितांना गहिवरून आले होते. वनविभागाचे वनक्षेत्रपाल बी.एस. बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी.जे. सूर्यवंशी, जे.ए. अमलुक तसेच वनरक्षक शिरसाठ सुरेंद्र यांनी पंचनामा करून वनविभागाच्या हद्दीत माय-लेकाचा दफणविधी केला.
परिसरात हरणांची व मोरांची संख्या चांगली आहे; मात्र भीषण दुष्काळामुळे त्यांचेही अस्तित्व धोक्यात आले असल्याचे वन्यप्रेमींनी म्हटले आहे. संबंधित विभागाने या वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.