पालखेड आवर्तनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:01 AM2018-11-15T00:01:06+5:302018-11-15T00:12:45+5:30
तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना पालखेड डावा कालव्याला पाणी सुटणाºया दाव्या-प्रतिदाव्यामुळे सर्वसामान्य शेतकरी संभ्रमात पडले असून, पाणी सुटणार की नाही याबाबत अद्याप साशंकता व्यक्त केली जात आहे.
येवला : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना पालखेड डावा कालव्याला पाणी सुटणाºया दाव्या-प्रतिदाव्यामुळे सर्वसामान्य शेतकरी संभ्रमात पडले असून, पाणी सुटणार की नाही याबाबत अद्याप साशंकता व्यक्त केली जात आहे. उत्तर पूर्व भागात तर पिके करपून गेली; मात्र पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन मिळणार या भरवशावर लाल कांदा, जनावरांसाठी चारा पिके उभी केली. तालुक्यात विविध पक्ष आणि शेतकरी संघटनांनी पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन मिळण्यासाठी आंदोलने केली. पालखेडचे आवर्तन १५ नोव्हेंबरपर्यंत द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेने प्रशासनाकडे करूनही येवला तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. १५ नोव्हेंबरनंतर पाणी आल्यावर उभी पिके करपून जातील, अशी भीती शेतकºयांच्या मनात आहे. जलसंपदामंत्री आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत ओरड करूनसुद्धा येवलेकरांच्या पदरी काही पडले नाही. जेवढे दिवस पाणी उशिरा येईल तेवढे शेतकºयांचे नुकसान होऊन दुष्काळात हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो का? अशी चिंता शेतकरी वर्गाला सतावत आहे. पालखेड डावा कालवा प्रशासनाने तातडीने आवर्तन चालू करून शेतकºयांची उभी पिके वाचवावी व नंतर कागदी सोपस्कार पार पाडावे, कारण १५ आॅक्टोबरचा पाणीसाठा गृहीत धरून कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाण्याचे सिंचन, बिगर सिंचन आरक्षणाचे नियोजन केले जाते; मात्र यावर्षी अद्यापही काहीही नियोजन झालेले नाही. याचा फटका शेतकºयांना बसत असून, हेच का शेतकºयांना अच्छे दिन! असा टोला शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, सुभाष सोनवणे, अरुण जाधव, मल्हारी दराडे, शिवाजी वाघ यांनी लगावला आहे.
दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील संदेशावरून पाच दिवसांत आवर्तन मिळणार असल्याचे संदेश फिरत होते; मात्र जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे शेतकरी संघटनेने संपर्ककेला असता ठोस उत्तर मिळाले नाही. अद्याप पाणी नियोजन आराखडा तयार करण्याचे काम चालू असल्याचे समजले. तालुक्यात सध्या पालखेडचे पाणी आवर्तन मिळणार असल्याची चर्चा आहे; मात्र पाणी कोटा किती मिळेल? आवर्तन किती दिवस चालणार? याबाबत ठोस माहिती दिली नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.