खामखेडा परिसरातील शेतीला परगावच्या मजुरांचा हातभार
By admin | Published: December 22, 2015 10:03 PM2015-12-22T22:03:26+5:302015-12-22T22:04:13+5:30
खामखेडा परिसरातील शेतीला परगावच्या मजुरांचा हातभार
खामखेडा : परिसरात सर्वत्र उन्हाळी कांदा लागवड अंतिम टप्प्यात असून, सर्वत्र मजूरटंचाई जाणवत असल्याने परगावच्या मजुरांकडून कामे करून घेतली जात आहेत.
पूर्वी बागयती शेती मोजकी असल्याने गावातील स्थानिक मजुरांकडून शेतीची कामे करून घेतली जात असत. काही वेळेस स्थानिक मजुरांनाही कामे मिळत नसे. मात्र वीज आणि पीव्हीसी पाइपामुळे नदीपात्राचे पाणी शेतीसाठी उपयोगात आल्याने बागायती शेतीचा विकास झाला. शेती सपाटीकरण्यासाठी अत्याधुनिक अवजारांचा वापर होऊ लागला. त्यात जेसीबीसारखे यंत्र विकसित झाल्यामुळे जमीन सपाटीकरण लवकर होऊ लागले. उंचसखल भाग सपाट झाल्याने बागायती शेतीचे प्रमाण वाढले. जे मजूर दुसऱ्याकडे शेतकामाला जात होते ते स्वत: शेती करू लागल्याने मजुरांची कमतरता भासू लागली आहे.
तसेच बाजारात विविध कंपन्यांचे तणनाशक उपलब्ध झाल्याने कांद्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली. पूर्वी शेतीमध्ये गहू, हरभरा ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात असत. अगदी मोजके शेतकरी उन्हाळ कांद्याची लागवड करीत असत. त्यामुळे सहज मजूर उपलब्ध होत. परंतु आठ-दहा वर्षांपासून कांदा या पिकाकडे हमखास पैसा देणारे पीक म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीकडे वळाला आहे.
चार-पाच वर्षांपूवी कोकणातील आदिवासींकडे कामे नव्हती. त्यामुळे ते दिवाळीनंतर कामासाठी शहरात येत असत. परंतु तेही बागायती शेती करू लागल्याने त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे तेही अगदी मोजक्या प्रमाणात शहरात येतात. तेथील खासगी वाहनधारक लवकर सकाळी मजूर ज्या शेतकऱ्याने सांगितले त्याच्याकडे मजूर नेऊन सोडतात. काही वाहनधारक त्याच मजुरांमध्ये कामाला लागतात. (वार्ताहर)