परसुल, पांगळी नद्यांना पूर ; पुल पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 01:10 PM2019-11-02T13:10:08+5:302019-11-02T13:10:19+5:30
उमराणे : उमराणेसह परिसरात शुक्र वार (दि.१) रोजी रात्री नऊ वाजेपासुन ते शनिवारी सकाळी सात वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने येथील परसुल व पांगळी नदीला महापूर आला आहे.
उमराणे : उमराणेसह परिसरात शुक्र वार (दि.१) रोजी रात्री नऊ वाजेपासुन ते शनिवारी सकाळी सात वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने येथील परसुल व पांगळी नदीला महापूर आला आहे.परिणामी या नद्यांवरील गावाशी संपर्क जोडणारे पुले पाण्याखाली आल्याने वाड्यावस्त्यांवरील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे बाजरी, मका, कांदे आदी खरीप शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाच शुक्र वारी रात्री पुन्हा उमराणेसह परिसरातील सांगवी,कुंभार्डे, चिंचवे, गिरणारे, तिसगाव आदी गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. परिणामी झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश गावातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत असुन उमराणे येथील ब्रिटीशकालीन परसुल धरणावरील परसुल व पांगळी नदीला पूर आल्याने या नद्यांवरील गावाशी जोडणारे फरशी पुले व तालुक्याशी जोडणारा पुल पाण्याखाली आल्याने वाड्यावस्त्यांवरील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे. तसेच गावाबाहेरील जड वाहतुकीसाठी बनविण्यात आलेला बायपास रस्ताही पाण्याखाली आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान शनिवारी उमराणे येथे परसुल नदीकाठी आठवडे बाजार भरतो.परंतु दोन्ही नदींच्या पुरामुळे आठवडे बाजार भरत असलेल्या ठिकाणी पुराचे पाणी शिरल्याने आठवडे बाजार भरविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील मुख्य शिवाजी चौक व प्रमुख गल्ल्यांमध्ये भरविण्याचा निर्णय घेतला आहे.