परीट समाजाचे ‘कपडे धुणे’ आंदोलन
By admin | Published: September 20, 2016 01:10 AM2016-09-20T01:10:36+5:302016-09-20T01:13:09+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय : अनुसूचित जातीत समाजाला समाविष्ट करण्याची मागणी
नाशिक : परीट- धोबी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य परीट- धोबी सेवा मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साबण-पाण्याने कपडे धुवून आंदोलन केले.
दुपारी एक वाजेच्या सुमारास शेकडो परीट समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत रस्त्यातच ठाण मांडले. डॉ. भांडे समितीच्या शिफारशींची तत्काळ अंमलबजावणी करून परीट समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करून या समाजाला शासकीय सोयी, सवलती मिळवून द्याव्यात, अशी मागणी केली. या मागणीसाठी १२ आॅगस्ट २०१५ रोजी समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली असता, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोपही करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन समिती (बार्टी) या संस्थेने दिलेला खोटा अहवाल असून, तो रद्द करण्यात यावा व डॉ. भांडे समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी मागणी करीत आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी सोबत आणलेल्या बादल्यांमध्ये पाणी भरून रस्त्यावरच धुणे धुण्यास सुरुवात केली. (प्रतिनिधी)